Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 April, 2009

सार्दिन, देशप्रभूंचा विजय निश्चित : दिगंबर कामत

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन व उत्तर गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जीतेंद्र देशप्रभू यांचा विजय निश्चित असल्याचा दावा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केला आहे. सार्दिन यांना पन्नास हजार, तर देशप्रभू यांना पंचवीस हजारांचे मताधिक्क्य मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज पणजीत झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, खासदार तथा दक्षिण गोव्याचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन, उत्तरेतील राष्ट्रवादीचे उमेदवार जीतेंद्र देशप्रभू, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा आदी हजर होते. प्रचारकाळात दक्षिण गोव्यातील कानाकोपऱ्यात फिरलो असता सर्वत्र कॉंग्रेसचाच नारा गुंजत आहे. लोकांना पुन्हा डॉ.मनमोहनसिंग हेच पंतप्रधान हवे आहेत. दक्षिण गोव्यात विरोधकांनी कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेदांचा कितीही सवतासुभा उभा केला तरी ही जागा कॉंग्रेसलाच मिळेल, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला.या निवडणुकीच्या निमित्ताने विविध ग्रामीण भागांत प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाली व यानिमित्ताने या लोकांच्या समस्या जाणून घेतल्याचेही ते म्हणाले. सांगे तालुक्यातील आमडईवासीयांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता, त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली व त्यांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
दक्षिण गोव्यात प्रचारात आपल्याबरोबर कोण होते किंवा कोण नव्हते याचा आपण फारसा विचार करत नाही. सार्दिन यांचा विजय हेच आपले उद्दिष्ट असून ते साध्य होणार,असा दावाही त्यांनी केला.
गेल्या वीस महिन्यात राज्य सरकारने केलेल्या कार्याचा आलेख या प्रचारावेळी लोकांसमोर ठेवला. उत्तरेत देशप्रभूंचाच विजय
उत्तर गोव्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी पूर्णपणे देशप्रभू यांच्यासाठी झोकून दिल्याचे मुख्यमंत्री कामत म्हणाले.गेल्यावेळी सत्तरी,डिचोली,पेडणे,तिसवाडी आदी भागांत भाजपला मताधिक्य मिळाले होते या सर्व तालुक्यांवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला ताबा मिळवल्याचे ते म्हणाले.
माझे कार्य लोकांसमोर
खासदार या नात्याने आपण केलेले कार्य लोकांसमोर आहे व लोक आपल्या कार्याबाबत खूष आहेत,असा दावा सार्दिन यांनी केला.या भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडूनही चांगला पाठिंबा मिळत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.
हे तर दोन शेजाऱ्यांचे भांडण
आलेमाव बंधू व मिकी यांच्यातील भांडण हे दोन शेजाऱ्यातील भांडणासारखे आहे, त्यामुळे आलेमाव बंधूंवर शिस्तभंग कारवाई करण्याची आवश्यकता नाही,असे मत प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले. चर्चिल यांनी काहीही वक्तव्य केले तरी ते कॉंग्रेससाठीच काम करीत असून राज्यात सर्वत्र कॉंग्रेसचा "जय हो कॉंग्रेस'नारा सुरू असल्याचे ते म्हणाले.

No comments: