Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 23 April, 2009

उत्तरेत दुरंगी तर दक्षिणेत तिंरगी लढत

आज मतदान
पणजी, दि.२२ (प्रतिनिधी) : पंधराव्या लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका उद्या २३ रोजी होत आहेत. या टप्प्यात गोव्याचा समावेश असून उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघांसाठी उद्या सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. दोन्ही जिल्ह्यांत मतदारांना खुल्या व निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक उपाययोजना केली आहे.
यंदा निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यास केंद्राने नकार दिला असला तरी सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. राज्यात दोन्ही ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रे कर्मचाऱ्यांसह मतदान यंत्रणेने सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
उत्तरेत ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ख्रिस्तोफर फोन्सेको (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), जितेंद्र देशप्रभू (राष्ट्रवादी कॉंग्रेस), पांडुरंग राऊत (मगो) श्रीपाद नाईक (भाजप), उपेंद्र गावकर (शिवसेना) तसेच नरसिंह सुर्या साळगावकर व मार्था डिसोझा (अपक्ष) यांचा समावेश आहे. दरम्यान, उत्तर गोव्यात भाजपचे श्रीपाद नाईक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र देशप्रभू यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन (कॉंग्रेस), ऍड. नरेंद्र सावईकर (भाजप),ऍड. राजू मंगेशकर (भा.क.प), रोहीदास बोरकर ( सेव्ह गोवा फ्रंट) माथानी साल्ढाणा (युगोडेपा), जबाहर डायस, डेरीक डायस,फ्रान्सिस फर्नांडिस ,मुल्ला सलीम, स्मिता साळुंखे आणि हमजा खान (अपक्ष) यांचा सहभाग आहे. दक्षिणेत कॉंग्रेसचे सार्दिन, भाजपचे ऍड.नरेंद्र सावईकर व युगोडेपाचे माथानी साल्ढाणा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
गोव्यात एकूण १०,२०,७९४ पात्र मतदार आहेत. उत्तर गोव्यात ४,८६,९८३ तर दक्षिणेत ५,३३,८११ मतदारांची नोंदणी झाली आहे. उत्तर गोव्यासाठी ६७९ तर दक्षिणेसाठी ६६० मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघ प्रत्येक वीस विधानसभा मतदारसंघांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. उत्तर गोव्यात मांद्रे, पेडणे (राखीव अनुसूचित जाती) डिचोली ,थिवी ,म्हापसा ,शिवोली ,साळगाव ,कळंगुट, पर्वरी, हळदोणा, पणजी ,ताळगांव ,सांताकु्रज ,सांताआद्रें, कुंभारजुवा,मये, साखळी , वाळपई ,आणि प्रियोळ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात फोंडा,शिरोडा, मडकई,मुरगाव,वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी, नुवे , कुडतरी ,फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी, वेळ्ळी, केपे ,कुडचडे, सावर्डे ,सांगे आणि काणकोण यांचा समावेश आहे .
गोव्यात पोर्तुगीजांची राजवट असल्याने सुरुवातीस १९५२ आणि १९५७ साली झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत या राज्याचा सहभाग नव्हता. १९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर १९६२ साली राष्ट्रीय पातळीवरील लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्याची संधी या राज्याला मिळाली. गोव्यात पहिल्याच वेळी पीटर आल्वारीस यांची उत्तर तर मुकुंद शिंक्रे यांची दक्षिण गोवा मतदारसंघांसाठी निवड झाली होती. गोव्यात आत्तापर्यंत झालेल्या १२ लोकसभा निवडणुकीत गोव्यातील जनतेने निवडून दिलेल्या खासदारांत उत्तर गोव्यातून पीटर आल्वारीस(१९६३), जनार्दन शिंक्रे(१९६७), पुरुषोत्तम काकोडकर (१९७१), अमृत कांसार (१९७७), संयोगिता राणे (१९८०), शांताराम नाईक (१९८४), गोपाळ मयेंकर (१९८९), हरिष झांट्ये (१९९१),रमाकांत खलप(१९९६), रवी एस. नाईक(१९९८), श्रीपाद नाईक (१९९९), श्रीपाद नाईक (२००४) दक्षिण गोवा मतदारसंघात मुकुंद शिंक्रे (१९६३), इराज्मो डी सिक्वेरा (१९७६), एदुआर्द फालेरो (१९७१), एदुआर्द फालेरो (१९७७ ते १९९१), चर्चिल आलेमाव (१९९६), फ्रान्सिस सार्दिन (१९९८), रमाकांत आंगले (१९९९), चर्चिल आलेमाव (२००४) आणि २००७ साली झालेल्या पोटनिवडणुकीतसार्दिन यांची निवड झाली.उत्तरेत सतत दोन वेळा निवडून येण्याचा मान भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांना प्राप्त झाला आहे व ते यंदा हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. दक्षिणेत एदुआर्द फालेरो यांनी सतत पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांना केंद्रात कॉंग्रेस सरकारात मंत्रिपदही प्राप्त झाले होते.बाकी मगोतर्फे निवडून आलेले ऍड.रमाकांत खलप हे केंद्रीय कायदामंत्री बनले व श्रीपाद नाईक यांनाही केंद्रात भाजप सरकारात राज्यमंत्रिपद प्राप्त होण्याचा मान मिळाला. आतापर्यंतच्या निकालांवर नजर टाकल्यास उत्तर गोवा हा सुरुवातीस मगो व आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. दक्षिण गोव्यात कॉंग्रेसचा जोर असला तरी यावेळी तेथील वातावरण खूपच बदलल्याचे चित्र दिसून येते.
सर्वांत मोठ्या लोकशाहीची सर्वांत मोठी निवडणूक
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत देश सध्या निवडणुकीला सामोरे जात आहे. पंधराव्या लोकसभेची स्थापना करण्यासाठी गेल्या १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. एकूण १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १२४ मतदारसंघांसाठी यावेळी मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या २३ रोजी होईल. यात एकूण १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेश मिळून १४१ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात गोव्याचा समावेश असून उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही मतदारसंघांसाठी उद्या मतदान होईल. यानंतर ३० एप्रिल, ७ व १३ मे असे उर्वरित तीन टप्पे पार पडणार असून १६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
विद्यमान लोकसभा निवडणूक अनेक कारणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सारे जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली आले असताना आपल्या देशाला आता त्याची झळ लागणे सुरू झाले आहे. दहशतवादाचा विखार झपाट्याने फैलावत चालला आहे. देश महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत असताना विविध समस्या या मार्गात अडथळा ठरत आहेत. बेरोजगारी,गरिबी,आरोग्य सुविधांचा अभाव व पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे विकासाची गती मंदावत चालल्याने आपला देश अजूनही विकसित देशांच्या यादीपासून दूरच राहिला आहे. या स्थितीत देशाला पुढे नेण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. राजकीय दूरदृष्टी असलेले व विविध समस्यांचे निराकरण करून देशाला एक वेगळी दिशा प्राप्त करून देणारे सरकार हवे आहे.
यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७१ कोटी पात्र मतदारांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे मतदानासाठी एकूण ८.३ लाख मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. १४ व्या लोकसभेची अंतिम मुदत १ जून २००९ रोजी संपते, त्यामुळे २ जून २००९ पर्यंत १५ वी लोकसभा प्रस्थापित होणे गरजेचे आहे. यंदा पहिल्यांदाच छायाचित्रांकित मतदारयाद्यांचा वापर केला जाणार आहे. या निवडणुकीत ६ प्रमुख राष्ट्रीय पक्ष, ३६ प्रादेशिक पक्ष, १७३ नोंदणीकृत(अमान्यप्राप्त) व अनेक अपक्ष रिंगणात आहेत.कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी व भाजपकृत राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात सत्तास्थापनेसाठी चुरस आहे. डाव्यांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडीही स्थापन करण्यात आली आहे.

No comments: