Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 21 April, 2009

नावेली सभेनंतर दक्षिणेत कॉंग्रेस गलितगात्र!

पणजी, दि.२० (प्रतिनिधी) - दक्षिण गोव्यात कॉंग्रेसतर्फे नावेली येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत घडलेला प्रकार कॉंग्रेससाठी हानिकारक ठरला आहे. प्रत्यक्ष मतदानाला केवळ तीन दिवस बाकी असताना पक्षातील अंतर्गत हेवेदावे व शहकाटशहाचे जाहीर प्रदर्शनच या सभेत घडल्याने नेते व कार्यकर्त्यांत तीव्र निराशा पसरली आहे. उत्तर गोव्यात भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांची हॅट्रीकच्या दिशेने वाटचाल सुरू असताना केवळ अंतर्गत राजकीय डावपेचांमुळे दक्षिण गोव्याचा बालेकिल्लाही हातातून निसटण्याची परिस्थिती कॉंग्रेसवर ओढवल्याने कॉंग्रेस गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे सारा पक्षच गलितगात्र बनला आहे.
केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या घटकांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची साथ सोडून स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस तोंडघशी पडली आहे. कॉंग्रेसकडून डॉ.मनमोहनसिंग यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन मतदारांना केले जात असले तरी संपुआ च्या विविध नेत्यांचेही या पदावर लक्ष आहे व त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा व्यक्त केली आहे. खुद्द संपुआचे घटक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ.मनमोहनसिंग हे फक्त कॉंग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत संपुआचे नव्हेत,असे म्हणून कॉंग्रेसची हवाच काढून घेतली आहे. भाजपप्रणीत रालोआ सध्याच्या परिस्थितीत प्रचारात आघाडीवर असून लोकसभेत भाजप हाच सर्वांत मोठा पक्ष बनेल,असा विविध राजकीय समीक्षकांचा अंदाज आहे. गोव्यातही नेमकी तीच परिस्थिती आहे. राज्यातील दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडी सरकारातील अंतर्गत लढाई व सरकारचे विविध वादग्रस्त निर्णय यामुळे कॉंग्रेसचे पारंपरिक मतदारही विटले असून त्यांनी नव्या पर्यायाचा शोध चालवल्याची चाहूल स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, केंद्रात सत्तांतर घडल्यास गोव्यातही सत्तापालट होईल याची चाहूल लागल्याने येथील काही सत्ताधारी नेत्यांनी आपले डावपेच सुरू केले आहेत.उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने देशप्रभू यांच्यासाठी सरकारला पाठिंबा देणारे सर्व घटक एकत्र आले आहेत व त्यांनी कॉंग्रेसच्या संघटनात्मक रचनेलाच सुरुंग लावण्याचे प्रयत्न चालवले आहेत. विश्वजित राणे यांनी स्वबळावर जितेंद्र देशप्रभू यांना विजयी करण्याचा चंग बांधला असून संपूर्ण उत्तर गोव्यावर आपला प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी अत्यंत शिस्तबद्धतेने आखणी सुरू केली आहे. दक्षिण गोव्याची जबाबदारी कॉंग्रेसवर आहे व मुख्यमंत्री दिगंबर कामत हे दक्षिणेतील असल्याने ही जागा मिळवणे ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठा बनली आहे. दरम्यान, सार्दिन यांच्यासाठी दक्षिणेतील कॉंग्रेस नेतेच सक्रियपणे प्रचारात उतरले नाहीत,अशीच परिस्थिती पसरली आहे. ही जागा गमावल्यास त्याचा ठपका मुख्यमंत्री कामत यांच्यावर येणार असल्याने सरकारातील काही नाराज घटकांनी मुख्यमंत्र्यांना वेठीस धरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचीही चर्चा आहे. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील एक महत्त्वाचा घटक सध्या यात सक्रिय बनला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नेतृत्व बदलाचा विचारही या गोटात सुरू आहे.दक्षिण गोव्यातील अल्पसंख्याक ख्रिस्ती मतदार ही आपली मक्तेदारी असल्याच्या आविर्भावात असलेल्या कॉंग्रेसला हा समाजच यंदा चांगलाच दणका देण्याची शक्यता आहे. या मतदारांना युगोडेपाचे उमेदवार माथानी साल्ढाणा यांचा चांगला पर्याय मिळाला आहे तसेच पहिल्यांदाच या समाजातील लोक उघडपणे भाजपचे गुणगान गात असल्याचेही दिसत असल्याने यंदा दक्षिणेचा निकाल क्रांतिकारक ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.
चर्च धर्मगुरूंना साकडे
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आर्चबिशपने विविध चर्चसंस्थांत प्रार्थनासभांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.या प्रार्थनासंभाच्या अनुषंगाने काही कॉंग्रेस नेत्यांनी धर्मगुरूंना साकडे घालून ख्रिस्ती मतदारांना कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्याची विनंती केल्याची एकच चर्चा सध्या पसरली आहे. दरम्यान,राज्यातील कॉंग्रेस सरकारने घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांच्या विरोधात उभे राहिलेल्या आंदोलनात चर्चसंस्थेने आघाडी घेतल्याने तसेच अनेक धर्मगुरूंनीही या आंदोलनात सक्रियपणे भाग घेतल्याने उघडपणे कॉंग्रेसची बाजू घेणे शक्य नसल्याचे त्यांना सुनावल्याची खबर मिळाली आहे. दरम्यान,या प्रार्थनासभांत धार्मिक पक्ष व जातीयवादी पक्षांपासून सावध राहण्याचे आवाहन करून या हाच मुद्दा मतदारांच्या मनावर बिंबवण्याचाही विचार सुरू आहे,अशीही माहिती मिळाली आहे.

No comments: