Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 April, 2009

वायंगिणी किनारा अखेर झाला खुला!

पणजी, दि.१९ (प्रतिनिधी)- दोनापावला येथील वायंगिणी समुद्र किनारा हा इतर किनाऱ्यांप्रमाणेच सुदंर व पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. आत्तापर्यंत "सिदाद दी गोवा'या हॉटेलच्या ताब्यात असलेला हा किनारा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सार्वजनिक मालमत्ता असल्याचे उघड झाल्याने "गोवा बचाव अभियान' संघटनेकडून अनोखी सहल या किनाऱ्यावर आयोजित करून हा किनारा सर्वांसाठी खुला झाल्याचा संदेश सर्वत्र पोहचवला आहे. एका अनोख्या पद्धतीने आयोजित केलेल्या या सहलीला अनेक समाजकार्यकर्त्यांनी भरघोस प्रतिसाद दिला व सहल हा प्रकारही आंदोलनाचा एक भाग बनू शकतो याची प्रचिती या निमित्ताने आली.
दोनापावला येथे सार्वजनिक वापरासाठी निश्चित केलेल्या जागेवर हॉटेल "सिदाद दी गोवा'कडून अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे बांधकाम ताबडतोब पाडण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाची अंमलबजावणी २० एप्रिल २००९ पर्यंत राज्य सरकारला करावयाची होती, परंतु राज्य सरकारने मात्र भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून वटहुकूम जारी केला व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बासनात गुंडाळून टाकला. एखाद्या बड्या हॉटेल मालकाचे हीत जपण्यासाठी सरकारकडून अनधिकृत बांधकामाला संरक्षण देताना खुद्द कायदाच बदलू शकतो, हेच याप्रकारावरून सिद्ध झाल्याने या विषयावरून "गोवा बचाव अभियान' संघटनेतर्फे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. हा वटहुकूम विधानसभेत सरकारने बहुमताच्या जोरावर मान्य करून घेतला तो दिवस काळादिन' म्हणूनही पाळण्यात आला. मुळात सरकारला या हॉटेल मालकाचे हित जपायचे होते तर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना वटहुकूम का जारी करण्यात आला नाही,असा सवाल आनंद मडगावकर यांनी केला. सरकारच्या या वटहुकमामुळे वायंगिणी किनारा पुन्हा एकदा या हॉटेल मालकाची खाजगी मालमत्ता बनेल काय, हे मात्र माहीत नाही असे सांगून सार्वजनिक मालमत्ता आपल्या ताब्यात ठेवून तिथे जनतेला निर्बंध घालण्याचा हा प्रकारच निराळा असल्याचे ते म्हणाले. वायंगिणी किनाऱ्यावर आता लोकांनी व पर्यटकांनी मोठ्या संख्येत यावे व या किनाऱ्याची मजा लुटावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, या सहलीनिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. "सॅटर्डे इव्हनींग क्विझ क्लब'तर्फे प्रश्नमंजूषा स्पर्धा, आंतोनियो कॉस्ता यांच्यातर्फे चित्रकला कार्यशाळा, "द मस्टर्ड सीड कंपनी'तर्फे नाट्य कार्यशाळा तसेच संगीत, विविध मनोरंजनपर खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोवा बचाव अभियानाच्या उपनिमंत्रक सॅबीना मार्टीन्स, क्लॉड आल्वारीस, प्रजल साखरदांडे,आनंद मडगावकर, जॉन्सन फर्नांडिस, मिंगेल फर्नांडिस, प्रविण सबनीस, रिबोनी शहा आदी हजर होते. सहलीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात खाजगी वेशात पोलिस फिरत असल्याचेही दिसत होते.

No comments: