कॉंग्रेस श्रेष्ठींच्या स्थानिक नेत्यांना स्पष्ट सूचना
मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी)
वालंकाच्या अपात्रतेवरून राजीनामानाट्य रचलेले आलेमावबंधू जरी श्रेष्ठींनी आपणास विविध आश्वासने दिल्याच्या फुशारक्या मारत असले तरी प्राप्त माहितीनुसार, आलेमावबंधूंच्या कुटुंबकेंद्रित राजकारणाचा कॉंग्रेस श्रेष्ठींना वीट आला आहे. ही मंडळी आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊन पक्षाला अडचणीत आणण्याची शक्यता श्रेष्ठींनी पूर्वीच्या अनुभवांवरून गृहीत धरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आलेमावबंधू पक्षात असले तर ठीक; नपेक्षा त्यांच्याविना निवडणुकीस सामोरे जाण्याच्या तयारीला लागा, अशा स्पष्ट सूचना स्थानिक नेत्यांना मिळाल्याचे खास गोटातून सांगण्यात आले.
युवा कॉंग्रेस निवडणुकीतून वालंका हिला अपात्र ठरविण्यावरून आलेमावबंधूंनी केलेला थयथयाट व त्यातून मंत्रिपदाचा व कॉंग्रेस पक्षाचाही त्याग करण्यापर्यंत त्यांची गेलेली मजल शेवटी त्यांच्याच अंगलट आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात त्यांना श्रेष्ठींकडून कोणतेच आश्वासन देण्यात आलेले नाही. उलट, ‘मुकाट गोव्यात चला व राजीनामे मागे घ्या; अन्यथा मंत्रिपदालाही मुकाल’, अशी तंबी त्यांना मिळाली आहे व त्यामुळेच ते रिकाम्या हाताने गोव्यात परतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारच्या घडामोडींनंतर तातडीने दिल्लीस गेलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी झालेल्या खास बैठकीत एकंदर घटनाक्रमावर गंभीरपणे चर्चा झाली. त्यावेळी कामत यांनी आलेमावबंधूंनी पक्षाशी फारकत घेतली तर कॉंग्रेसला सासष्टीत निवडणुका जड जातील; त्यामुळे त्यांच्याशी सामोपचाराने वागणेच योग्य होईल, अशी भूमिका घेतली. त्यावर, सामोपचाराने घेतले तरी आगामी निवडणुकांत ही मंडळी कॉंग्रेसबरोबर राहतील याची हमी कोण घेतोय, असा उलट सवाल श्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांना केला व या लोकांची खुशामत करण्याचे बंद करा, अशी समज त्यांना दिली. त्यानंतर कामत यांनी आणखी शोभा नको, असा विचार करून आलेमाव यांचे समर्थन करणे बंद केले व रविवारी रात्री थांबून ते सोमवारी तडक गोव्यात परतले.
सूत्रांनी असेही सांगितले की, चर्चिल यांच्याबाबत कॉंग्रेसने आता कडक धोरण स्वीकारले आहे. ते आहेत त्या स्थितीत पक्षात राहिले तर ठीक; न राहिले तर त्यांच्याविना निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीला आत्तापासूनच लागण्याच्या सूचना स्थानिक नेतृत्वाला दिल्या गेल्या आहेत. तसेच यापुढे चर्चिलचे कोणतेही फाजील लाड केले जाऊ नयेत असेही बजावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक जणांना उमेदवारी दिली जाऊ नये या नियमास अजूनही श्रेष्ठी चिकटून आहेत. मात्र, एकवेळ सध्याची (एका कुटुंबातील दोघांना उमेदवारी) स्थितीही कायम ठेवली जाईल. पण, कोणत्याही परिस्थितीत एका कुटुंबातील चौघांना उमेदवारी मिळणे शक्य नाही व तसे कोणतेही आश्वासन आलेमावबंधूंना दिले गेलेले नाही. वालंकाला युवा कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समितीवर घेण्याबाबत या सूत्रांनी सांगितले की, तसे आश्वासन केवळ युवा कॉंग्रेस नेते राहुल गांधीच देऊ शकतात. पण, सद्यःस्थितीत तसे आश्वासनही दिले गेलेले नाही.
आलेमाव कुटुंबाने कॉंग्रेसला दिलेले योगदान जरी मोठे असले तरी त्यांच्या करणीमुळे पक्षाच्या प्रतिमेला बसलेला हादराही मोठा असून त्याची भरपाई कोणत्याही पद्धतीने होणे शक्य नसल्याचे आता श्रेष्ठींना कळून आले आहे. त्यामुळे प्रथमच कॉंग्रेसने चर्चिल यांच्या संदर्भात कठोर पावले उचलली आहेत. यापूर्वी दोन वेळा चर्चिल यांनी कॉंग्रेसला ‘हात’ दाखविलेला असून या वेळीही ते तशीच पावले उचलतील, अशी चर्चा सुरू असतानाच युवा कॉंग्रेस निवडणुकीचे निमित्त करून राजीनाम्याचे अस्त्र उगारून चर्चिल बंधूंनी या चर्चेला एका प्रकारे पुष्टीच दिली आहे. त्यामुळेच कॉंग्रेस श्रेष्ठींनी आता सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे समजते.
Thursday, 28 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment