आणखी दोन पोलिस गुंतल्याचे उघड
वास्को, दि. २९ (प्रतिनिधी): कळंगुट येथील कॅसिनोत बनावट नोटाघेऊन खेळण्यासाठी आलेल्या तीन युवकांना अटक केल्यानंतर वास्को पोलिस स्थानकातील एका अधिकार्यानेच या नोटा त्यांना पुरवल्याचे काल समोर आले होते. दरम्यान, या प्रकरणात आणखी दोघा पोलिसांचा समावेश असल्याचे आज उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. अटक करण्यात आलेल्या हेमंत चोडणकर या संशयिताची गाडी आज संध्याकाळी कळंगुट पोलिसांनी चिखली, वास्को येथून महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या घरासमोरून जप्त केली.
बनावट नोटाप्रकरणी कळंगुट पोलिसांनी सावंतवाडी येथील सुदेश गौड व वास्कोतील हेमंत चोडणकर व आदित्य (चिंतामणी) यादव या युवकांना चार दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर आदित्य याच्या फ्लॅटवर धाड घातली असता २ लाख ७७ हजार ५०० रुपयांच्या आणखी बनावट नोटा सापडल्या. या प्रकरणात वास्को पोलिस स्थानकातील एका अधिकार्याचा समावेश असल्याचे समजल्याने कळंगुट पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी त्यांची चौकशी केली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी दोन पोलिस गुंतले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अधिकार्यांची नावे उघड करण्यास नकार दिला.
महसूलमंत्र्यांच्या घरासमोरून गाडी जप्त
दरम्यान, आज संध्याकाळी कळंगुट पोलिसांनी संशयित हेमंत याने कॅसिनोत जाताना वापरलेली चारचाकी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्या घरासमोरून जप्त केली. या घटनेमुळे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. याप्रकरणी ‘गोवादूत’च्या प्रतिनिधीने जुझे फिलिप यांना छेडले असता त्यांनी संशयित हेमंत आपल्याला भेटायला आला होता हे मान्य केले. मात्र, असे हजारो लोक आपल्याला रोज भेटण्यासाठी येत असतात, असेही ते म्हणाले.
Saturday, 30 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Diploma in computer application
Good action by goa police keep it up
Post a Comment