पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): युवक कॉंग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी आपल्या वडिलांच्या राजकीय पदाचा दुरुपयोग करणे व कॉंग्रेसच्या नेत्यांची मदत घेणे या कारणांवरून वालंका आलेमाव हिला निवडणूक लढवण्यापासूनच अपात्र ठरवल्याचा निर्णय आज युवक कॉंग्रेसच्या निवडणूक समितीने जाहीर केला. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी लगेच मंत्रिपद व कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा करून एका राजकीय ‘तियात्रा’ला सुरुवात केली.
दरम्यान, प्रसारमाध्यमांना आपल्या वारका येथील निवासस्थानी बोलावून आपले राजीनामापत्र मुख्यमंत्री कामत यांना सादर केल्याचे वक्तव्य केलेल्या आलेमावबंधूंनी मुख्यमंत्री कामत यांनी लेखी राजीनामा पत्र अद्याप मिळालेच नाही, असा खुलासा करताच लगेच कच खाल्ली. पहिल्या घटकेलाच उघडे पडलेल्या आलेमावबंधूंनी यासंबंधी दिल्लीत श्रेष्ठींना २४ तासांची मुदत दिली असून त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे सांगून हा दबावरूपी राजकीय ‘तियात्र’ पुढे सुरू ठेवण्याचे संकेत दिले. मात्र, सरकारातील सर्व नेते एकसंध आहेत, अशी घोषणा करून चोवीस तासही उलटले नाही तोच आलेमावबंधूंनी सरकारलाच वेठीस धरून हा दावा करणार्या मुख्यमंत्र्यांना साफ तोंडघशी पाडले आहे.
चर्चिल आलेमाव यांच्या कन्या वालंका आलेमाव हिने निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवून संघटनेच्या निवडणूक आयोगाने एक वर्षासाठी युवक कॉंग्रेस किंवा ‘एनएसयुआय’ च्या निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवण्याचा निर्णय जाहीर केला. विभागीय निवडणूक अधिकारी सुमीत खन्ना यांनी या संबंधीची माहिती दिली. वालंका आलेमाव व जितेश कामत यांना तीन दिवसांपूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या व त्यांनी त्यासंबंधी खुलासाही पाठवला होता. वालंका हिच्या खुलाशाबाबत समाधानी नसलेल्या निवडणूक आयोगाने अखेर त्यांना ही निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवले. वालंका हिच्या अपात्रतेची वार्ता कळताच आलेमावबंधूंनी तात्काळ वारका येथे प्रसारमाध्यमांसमोर आपल्याच सरकारच्या विरोधात तांडव केले. हे कॉंग्रेसरचित षड्यंत्र असल्याचा आरोप करून मंत्रिमंडळ व पक्षसदस्यत्वाचा राजीनामा सादर केल्याची हूल त्यांनी उठवून दिली. दरम्यान, पत्रकारांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला लेखी काहीही प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. आलेमाव यांनी दिल्लीत संपर्क साधला असून हा विषय योग्य व्यासपीठावर सोडवला जाईल, असेही ते म्हणाले.
Sunday, 24 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment