वास्को, दि. २५ (प्रतिनिधी): दुचाकीवरून घरी जात असताना केळशी, कुठ्ठाळी येथील जुझे लियेंड्रो डिसोझा (३८) याला वेर्णा हमरस्त्यावर मागून येणार्या टेम्पोने धडक दिल्यामुळे त्याखाली सापडून तो जागीच ठार झाला. भरवेगाने टेम्पो हाकून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जेसिंग किरो (२६, ओरिसा) या टेम्पो चालकाला पोलिसांनी अटक केली.
आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. केळशी, कुठ्ठाळी येथे राहणारा जुझे आपल्या पत्नी व मुलाला ऍक्टीव्हा दुचाकीवरून (क्रः जीए ०६ सी ३००१) वेर्णा येथे सोडून घरी परतत असताना वेर्णा महामार्गावर भरवेगाने येणार्या जीए ०२ यू ६५४९ या क्रमांकाच्या टेम्पोने त्याला मागून जबर धडक दिली. सदर अपघातात जुझे रस्त्यावर फेकला गेला व टेम्पो त्याच्या अंगावरून गेला. यात तो जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला व तो शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिला. टेम्पो चालक जेसिंग याच्यावर पोलिसांनी भा. दं. सं.च्या २७९ व ३०४(ए) कलमाखाली गुन्हा नोंद करून नंतर त्याला अटक केली. पोलिस सूत्रांनुसार, सदर टेम्पो चालक मूळ ओरिसा येथील असून तो गेल्या काही काळापासून वेर्णा येथे राहत आहे.
दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असलेल्या जुझे याच्या मृत्यूमुळे केळशी भागात दुःखाचे वातावरण पसरले आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Tuesday, 26 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment