आश्वासनामुळे राजीनामे मागे - चर्चिल
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)
वालंका आलेमाव हिला बाणावलीची तर युरी आलेमाव याला सांगेची उमेदवारी देण्याबाबत गंभीरपणे विचार करू, असे आश्वासन कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिले आहे. आलेमाव कुटुंबीय हा कॉंग्रेसचा आधार आहे व पक्ष त्यांचा नेहमीच ऋणी राहील, अशा शब्दांत श्रेष्ठींनी समजूत काढल्यानेच आपण राजीनामे मागे घेत आहोत, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज दाबोळी विमानतळावर आगमन होताच पत्रकारांशी बोलताना केले.
युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून वालंका आलेमाव हिला अपात्र केल्याने चवताळलेल्या आलेमावबंधूंची कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्लीत समजूत काढण्यात अखेर यश मिळवले. श्रेष्ठींशी झालेल्या चर्चेअंती अखेर त्यांनी माघार घेण्याचे ठरवले. दरम्यान, आलेमावांकडून वेळोवेळी कॉंग्रेस पक्षाला वेठीस धरण्याचे राजकारण केले जात असल्याने त्यांना श्रेष्ठींनी चांगलेच खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज चर्चिल, ज्योकीम व वालंका आलेमाव गोव्यात परतले. वालंका आलेमाव हिला पक्षाचे काम करू दे; योग्य वेळ आल्यावर तिला पक्षात स्थान मिळवून देण्याचे श्रेष्ठींनी सांगितल्याचीही खबर आहे. चर्चिल आलेमाव यांनी मात्र गोव्यात परतल्यावर केलेल्या वक्तव्यावरून आता पक्षात अधिकच धुसफुस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वालंका आलेमाव हिला बाणावलीची उमेदवारी देण्याचे मान्य करतानाच सांगे मतदारसंघात कुणाही कॉंग्रेस नेत्याचा वावर नाही की दावाही नाही; त्यामुळेच पुढील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने युरी याला ‘आगे बढो’ असा संदेश दिल्याचे चर्चिल म्हणाले.
दरम्यान, याप्रसंगी वालंका आलेमाव हिने स्वतः श्रेष्ठींपुढे आपली भूमिका स्पष्ट केली, असेही चर्चिल म्हणाले. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे सरचिटणीसपद किंवा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे महत्त्वाचे पद देण्याचेही श्रेष्ठींनी मान्य केले होते. पण वालंका हिने ते स्पष्टपणे नाकारले, अशी माहितीही चर्चिल यांनी दिली. वालंका हिने गोव्यात कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठीच आपण वावरत असल्याचेही श्रेष्ठींना पटवून दिले. श्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनानंतर आमच्या मनातील सर्व संशय दूर झाला असून त्यामुळेच राजीनामे मागे घेण्याचे ठरवले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Wednesday, 27 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment