माध्यमप्रश्नी कामत सरकारचा कडाडून निषेध
फोंडा, दि.२३ (प्रतिनिधी): फोंडा भागातील महाविद्यालयीन, उच्च माध्यमिक विद्यालयांतील असंख्य विद्यार्थ्यांनी शनिवार २३ जुलै हा ‘काळादिन’ पाळून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यमाला अनुदान देण्याच्या निर्णयाचा कडाडून निषेध केला.
या कार्यक्रमात पीईएस महाविद्यालय, जीव्हीएम महाविद्यालय, एस. एस. समिती उच्च माध्यमिक विद्यालय, विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय, अमेय उच्च माध्यमिक विद्यालय व इतर शैक्षणिक आस्थापनांत शिक्षण घेणार्या सुमारे एक हजार युवक -युवतीनी फोंड्यात भव्य रॅली काढून ऐतिहासिक क्रांती मैदानावर निषेध सभा घेतली. रॅलीला फर्मागुडीतील पीईएस महाविद्यालयाजवळून प्रारंभ करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मायभाषेचा जयघोष करताना मुख्यमंत्री कामत यांचा निषेध करणार्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. माध्यमप्रश्नावरून फोंड्यातील युवावर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असून यापुढेही सदर प्रश्न धसाला लागेपर्यंत गप्प बसणार नाही, असा जळजळीत इशारा निषेध सभेत देण्यात आला.
माध्यमप्रश्न हे मोठे षड्यंत्र असून कामत यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यातील भ्रष्टाचार, गैरकारभार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांना नोकर्या देण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे हे अपयश लपवण्यासाठी कॉंग्रेसने माध्यमप्रश्न निर्माण केला आहे, असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
इंग्रजीला आमचा विरोध नाही. मात्र, प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे मातृभाषेतून झाले पाहिजे. त्यामुळे प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यमाला विरोध आहे. मातृभाषेचा गळा घोटण्याच्या षड्यंत्रात आपण कदापि सहभागी होणार नाही. मातृभाषेच्या सर्ंवधनासाठी लढणार आहोत. माध्यमप्रश्नावरून आवाज उठवणार्या युवकांना भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. या प्रश्नावर लढ्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन पर्रीकर यांनी केले.
माध्यम प्रश्नाला सर्वच स्तरातून विरोध होत असूनही सरकार मात्र इंग्रजीकरणावर
ठाम आहे. त्यामुळे यापुढे हे आंदोलन आणखी प्रखर करावे लागणार आहे. तरुणाईने यात मोठ्या संख्येने योगदान द्यावे, असे साहित्यिक विष्णू वाघ म्हणाले.
येत्या १५ ऑगस्ट रोजी पणजीत युवकांच्या मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजदीप नाईक, राहुल नाईक, दीपक, अमेय नाईक, युगांक नाईक व इतरांनी विचार मांडले. पीईएस महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या श्री सरस्वतीला माध्यमप्रश्नी गार्हाणे घातले जाणार आहे, असे साईश खांडेपारकर यांनी सांगितले.
युवकामध्ये माध्यमप्रश्नी जागृतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता दुसर्या टप्प्यातील जागृती मोहिमेला प्रारंभ केला जाणार आहे, असे युगांक नाईक यांनी सांगितले.
Sunday, 24 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment