Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 25 July, 2011

चर्चिल व ज्योकीम यांना दिल्लीत पाचारण

राजीनामानाट्याचा आज निकाल शक्य

मडगाव, पणजी, द. २४ (प्रतिनिधी)
वालंका आलेमाव हिला युवक कॉंग्रेस निवडणुकीतून अपात्र ठरवल्याप्रकरणी चर्चिल व ज्योकीम आलेमाव यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे दिल्लीतील कॉंग्रेसश्रेष्ठी बरेच संतापले आहेत. वालंकाची अपात्रता मागे घेणे म्हणजे राहुल गांधी यांची हार ठरेल व त्यामुळेच आलेमांवबंधूंच्या दादागिरीला अजिबात भीक न घालण्याचाच निश्‍चय श्रेष्ठींनी केल्याचे कळते. या दोन्ही बंधूंना समज देण्यासाठी आज तात्काळ दिल्लीला पाचारण करण्यात आले असून उद्या २५ रोजी संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल, अशी माहिती कॉंग्रेस सूत्रांकडून मिळते.
आलेमावबंधूंनी लेखी राजीनामा दिला नाही, असा दावा करणार्‍या मुख्यमंत्र्यांना खोटे ठरवतानाच आज चर्चिल व ज्योकीम आलेमाव यांनी आपल्या सरकारी वाहनांचा ताबा सोडला व खरोखरच राजीनामा दिल्याची प्रचिती करून दिली. चर्चिल ही काय चीज आहे हे दिगंबर कामत व सुभाष शिरोडकर यांना ठाऊक आहे व त्यामुळेच ते राजीनाम्याबाबत काहीही बोलण्याचे धाडस करणार नाहीत, असे चर्चिल म्हणाले. आज सकाळी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेऊन त्यांना या राजीनाम्याची कल्पनाही त्यांनी दिली. आता फक्त श्रेष्ठींच्या निकालाची वाट पाहत आहे, असे सांगून त्यांनी वालंका प्रकरणी अजिबात माघार घेणार नाही, असा दृढनिश्‍चय व्यक्त केला.
वालंका आलेमाव हिला अपात्र करण्याचा आदेश निघाल्यानंतर तात्काळ चर्चिल यांनी वालंकासोबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची मडगाव निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री कामत यांना फैलावर घेऊन हा आदेश तात्काळ मागे घ्या, अन्यथा आपल्याला दोष देऊ नका, अशी तंबी त्यांनी दिल्याचे कळते. मुख्यमंत्री कामत हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले. त्यांनी दिल्लीत पक्षाचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली. संध्याकाळी ब्रार यांनी चर्चिल यांच्याशी संपर्क साधून त्यांना बरेच सुनावल्याचे कळते. सुमारे दहा मिनिटे मोबाईलवर चाललेल्या संभाषणावेळी चर्चिल लालेलाल होऊन आपल्या वालंका हिच्यावर अन्याय झाल्याचे त्यांना सुनावत होते. यावेळीच दोन्ही बंधूंना दिल्लीत पाचारण करण्याचा संदेश पोहोचल्याने त्यांनी लगेच दिल्लीकडे धाव घेतल्याचीही खबर आहे.

कॉंग्रेसमध्ये खेकड्यांचे राजकारण
नगरपालिका सभागृहात हरिजन कल्याण संघटनेच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला चर्चिल आलेमाव व पंचायतमंत्री बाबू आजगावकर हजर होते. या कार्यक्रमांत चर्चिल यांनी उघडपणे आपल्याच नेत्यांवर सडकून टीका केली व पक्षात खेकड्यांचे राजकारण सुरू असल्याची टीकाही केली. ‘सेव्ह गोवा फ्रंट’ पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करताना वालंका हिला लोकसभेची उमेदवारी देण्याचे ठरले होते. काही स्थानिक नेत्यांनी श्रेष्ठींची दिशाभूल करून तिला डावलले. अखेर पक्षाचा विचार करून स्वस्थ बसलो. आता युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत वालंकाबाबत जो प्रकार घडला तो म्हणजे अन्यायाची परिसीमा ठरली व आता आपण अजिबात गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. संकल्प आमोणकर यांनी केलेले पन्नास टक्के सदस्य बोगस आहेत. प्रतिमा कुतिन्हो व संकल्प आमोणकर यांच्यावर खटले आहेत तर वालंकावर कसलाच ठपका नाही, हाच तिचा दोष म्हणावा काय, असा प्रतिसवालही त्यांनी केला. वालंकाच्या अपात्रतेचे नेमके कारण आपल्याला हवे. ती जर नको होती तर तिला युवक अध्यक्षपदाची लालूच का दाखविली गेली, याचा जाब चर्चिल यांनी कॉंग्रेसला विचारला आहे. आपण कॉंग्रेस कधीच सोडली नाही तर पक्षानेच आपणाला ती सोडण्यास भाग पाडले याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. आपण कॉंग्रेसचीच ताकद वाढवत आहे पण हे काही नेत्यांना नको आहे व त्यामुळेच ही कारस्थाने रचली जात आहेत. राजीनामा सादर करून कॉंग्रेसला ‘ब्लॅकमेल’ केल्याच्या आरोपाचा इन्कार करीत आपल्याबरोबर लोक आहेत व तेच आपले भवितव्य ठरवतील असेही ते म्हणाले.

‘सर, इनजस्टीस’...
मडगाव नगरपालिकेतील एका कार्यक्रमात उपस्थित राहिले असता चर्चिल यांचा मोबाईल खणाणला. साधारण सहा मिनिटे त्यांचे संभाषण समोरच्या व्यक्तीकडे चालले होते. प्रत्येकवेळी ‘सर’ हा उच्चार ते करताना आढळले, यावरून ते श्री. ब्रार यांच्याशी बोलत असल्याचा अंदाज काहीजणांनी काढला. ‘इनजस्टीस’ या शब्दाचा उल्लेख करून ‘पब्लिक इज वीथ मी’ असे सांगून त्यांनी आपला मोबाईल मंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे दिला. या संभाषणानंतर चर्चिल यांचा चेहरा लालेलाल व उतरलेला दिसून आला. त्याचवेळी त्यांनी आपल्या साहाय्यकाला बोलावून दिल्ली विमानाची चौकशी करण्यास व आपणाला दिल्लीला जावयाचे असल्याचे सांगितले. दुसरीकडे बाबू आजगावकर यांनी वालंका प्रकरणी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता समोरील व्यक्तीने त्यांचे काहीही ऐकून घेतले नसल्याचे दिसून आले.

No comments: