Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 19 March, 2011

गोव्यातील बेकायदा खाण व्यवसायाला आवर घाला

श्रीपाद नाईक यांची लोकसभेत मागणी
पणजी, दि. १८
गोव्यात पोलाद खाण व्यवसाय देशभरातील तुलनेत जास्त आहे. कायदेशीर रूपाने ज्या प्रमाणात उत्खनन व्हावे त्यापेक्षा जास्त उत्खनन बेकायदा पद्धतीने गोव्यात होत आहे. केंद्र सरकारने यावर योग्य उपाय काढून या बेकायदा खाण व्यवसायाला आळा घालून राज्याची होत असलेली अपरिमित हानी रोखली पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपचे उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत केली.
या बेकायदा खाण व्यवसायामुळे गोव्यातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडली असून संबंधित सर्व गावांना धूळ खावी लागते. त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गोव्यातील हिरवळ पूर्णपणे नष्ट होत चालली आहे. खाणीतील सर्व माती शेतात टाकली जात असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसान भरपाईचीही व्यवस्था होत नाही. खनिज माल निर्यातीत केंद्र सरकारला कित्येक कोटींचे विदेशी चलन मिळत असते. त्यामधील थोडा वाटा गोव्याला दिला तर त्यांना थोडा तरी दिलासा मिळेल. शेवटी ही जबाबदारी केंद्राची असून त्यांनी नुकसान भरपाईची योजना तयार करून त्याचा लाभ गोव्याला द्यावा, असे श्रीपाद नाईक म्हणाले.
सन २०११-१२ च्या अंदाजपत्रकात जी निर्यात करण्यात येते त्यावर जकात कर वाढवला आहे. अंदाजपत्रकात सरकारने निर्यात कर जो ५ टक्क्यांवरून २० टक्के केला आहे तो कमी करून ५ टक्के करण्याची मागणी श्री. नाईक यांनी अर्थमंत्र्यांकडे केली आहे.
आगामी अंदाजपत्रक कृषी क्षेत्राला उत्तेजन देणारे असेल अशी चर्चा होती. परंतु, असे करावयाचे सोडून कृषी क्षेत्रातील पैसा कमी केला. सरकारने शेतकर्‍यांच्या कर्जावरील व्याज कमी केले असते तर शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहू शकले असते. परंतु सरकारने अलिशान गाड्यांवर व्याजदर कमी केले. यामागे श्रीमंत लोकांना अधिक श्रीमंत करण्याचाच प्रयत्न झाला, असा आरोपही श्री. नाईक यांनी केला.
महागाई कमी करण्यासाठी सरकारने अंदाजपत्रकात कसली व्यवस्था केली आहे, असा सवाल करून वाढत्या महागाईने आम आदमी त्रस्त बनला आहे, दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत आणि सरकारकडे यावर कोणतीही उपाययोजना नाही असेही श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
२जी स्पेक्ट्रम घोटाळा महाघोटाळा होऊन बसला आहे. कॉमन वेल्थ गेम्सच्या नावाखाली हजारो कोटींचा घोटाळा आपण पाहिला. जर मंत्रीच घोटाळे करू लागले तर सर्वसामान्य आम आदमी भ्रष्टाचार का करणार नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

No comments: