Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 March, 2011

यतीन पारेख यांना विजयाची पारख!

उपमहापौर तथा पणजी विकास आघाडीचे उमेदवार यतीन पारेख यांना निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपल्या विजयाची पारख झाली. त्यांनी भव्य मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा करण्याची घटना मात्र पणजीत चर्चेचाच विषय बनली. प्रभाग १९ मधून निवडणूक लढवणार्‍या यतीन पारेख यांची पणजी फर्स्ट पॅनलच्या महापौरपदाचे प्रमुख दावेदार तथा माजी महापौर अशोक नाईक व प्रसाद सुर्लकर यांच्याशी त्यांची टक्कर होणार आहे. या प्रभागांत एकूण ७९.८६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयोत्सव साजरा करून यतीन यांनी ‘शीता आधी मीठ’ खाण्याचा प्रकार केला आहे, अशी टीका अशोक नाईक यांनी केली. श्री. पारेख राजकारणात किती कच्चे आहेत हे उद्याच्या निकालाअंती स्पष्ट होईल, असा टोलाही श्री. नाईक यांनी हाणला.

पणजीच फर्स्ट
पणजी महापालिका निवडणुकीत झालेले विक्रमी मतदान हे ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या बाजूने मतदारांनी दिलेल्या कौलाचे द्योतक आहे. ३० जागांपैकी किमान २० जागांवर ‘पणजी फर्स्ट ’ पॅनलच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास अशोक नाईक यांनी व्यक्त केला. यतीन पारेख यांनी निकालापूर्वीच विजयोत्सव साजरा करण्याच्या प्रकाराबद्दल त्यांना छेडले असता उद्या निकाल स्पष्ट झाल्यावर त्यांना विजयी मिरवणूक काढून आनंद साजरा करण्याची संधी मिळणार नसल्यानेच त्यांनी आजच ही उमेद भागवून घेतली, असा जबर टोला त्यांनी हाणला.
स्पष्ट बहुमतच ः पर्रीकर
पणजी महापालिकेसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी व एकूणच मतदारांचा कल पाहता ‘पणजी फर्स्ट’ पॅनलला स्पष्ट बहुमत मिळेल यात वादच नाही, असा विश्‍वास पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. स्पष्ट बहुमतापेक्षाही अधिक जागा पॅनलच्या पारड्यात पडणार असल्याचे ते म्हणाले. मतदारांच्या चेहर्‍यावरील निर्धार महापालिकेवरील बदलाचे स्पष्ट संकेत देत होते, असेही ते म्हणाले.

No comments: