Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 13 March, 2011

आज पणजीची ‘परीक्षा’

पणजी महापालिकेसाठी आज मतदान होत आहे. पाच वर्षांपूर्वी जनतेने मतदान केले होते, त्याचे परिणाम गेली पणजीवासीयांनी भोगले. कुठे कचरासमस्या, कुठे वाहनांसाठी अनधिकृत शुल्क आकारण्याचे प्रकार, काही भागांत सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर वाहणारे घाण पाणी आणि वाहनांच्या पार्किंगसाठी धावाधाव. यावर कळस म्हणजे पणजीचे भूषण म्हणता येईल अशा भव्य मार्केट प्रकल्पाला आलेली अवकळा. तेथील गाळेवाटपात झालेला भ्रष्टाचार. किती उदाहरणे द्यावीत? शेतजमिनीतून जात असलेले रस्ते आणि बाजूला उभी राहात असलेली बांधकामे हाच विकास मानणारे नेते. या सर्वामागे कोणती शक्ती होती? या प्रत्येक प्रकरणात महापालिकेच्या सत्ताधारी गटाचा हात होता. अर्थात, याच गटाचे महापौर आणि त्यांचे ‘मार्गदर्शक’ बाबूश मोन्सेरात यांच्यावर याचे दायित्व आपोआप येते. आता हाच गट मतदारांना भविष्यातील विकासाची आश्‍वासने देत आहे, आमिषे दाखवित आहे. भूतकाळात ज्यांनी कुकर्मे केली, गोंधळ घातला, ज्यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीत अडकली आहे, जे कलंकित आहेत, त्यांनीच मतांची याचना करायची? त्या सर्वांना घरी पाठविण्याचा आजचा दिवस आहे. आज मला काही तरी मिळते आहे, फ्रीज दारात येऊन पडला आहे, टीव्हीही आला आहे, घरदुरुस्तीसाठी नोटांची पुडकी हाती दिली जात आहेत. हे सारे पदरी घेऊन मते विकण्याचा विचार करणारे मतदार येणारी पाच वर्षे वाया घालवणार आहेत यात शंकाच नसावी. ज्यांनी हे सारे दिले, ते लुटीचेच ना? तेच कथित नेते येत्या पाच वर्षांत पणजीचे ‘वस्त्रहरण’ करणार आहेत, तिजोरीवर डल्ला मारणार आहेत. त्यांच्या हाती या सुंदर नगरीचे भवितव्य सोपवणार की, या शहरातील डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आदी उच्चशिक्षित व्यक्ती पाठिंबा देत असलेल्या ‘पणजी फर्स्ट’ च्या उमेदवारांना निवडून देणार? मतदारांनो, आता अधिक विचार करण्यासाठी वेळ नाही. आपण केवळ आपलेच भवितव्य घडवणार आहोत असे नव्हे तर पणजीची सध्या सुरू असलेली दुर्दशा थोपवण्याचे ब्रह्मास्त्र तुमच्या हाती आहे. ‘मत’ हे त्याचे नाव. या प्रदेशातील एकमेव असलेली पणजी महापालिका घडवण्याचे कार्य आपल्या हातून घडणार आहे. ते व्यवस्थित पार पाडा, तसे झाले तरच ही नगरी टिकेल. मांडवीच्या किनारी वसलेली ही मोहक नगरी टिकवायची, या भागातील पर्यावरण जतन करायचे की झाडांची कत्तल होऊ द्यायची, शेतजमिनीत भराव टाकले जाताना फक्त बघायचे? आज हे कर्तव्य पार पाडले नाही, तर सारे पणजीवासीय पस्तावतील. क्रॉंक्रिटच्या जंगलात हरवतील. माणुसकी शोधूनही सापडणार नाही. हे टाळण्यासाठी, मतदारांनी असा राजकीय भूकंप घडवून आणावा, की त्यामुळे येणार्‍या सुनामीत सार्‍या दुष्प्रवृत्ती नष्ट होतील. पणजी महापालिका क्षेत्रातील पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, रायबंदर, मिरामार, आल्तिनो, भाटले, करंझाळे आदी भागातील सुज्ञ मतदारांपाशी तेवढी जाण आणि क्षमता निश्‍चितच आहे आणि त्याचा प्रत्ययही येईल यात शंका नाही.

No comments: