Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 March, 2011

यतीन पारेख महापौर

उपमहापौरपद रुद्रेश चोडणकरांना
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
पणजी विकास आघाडीच्या महापौरपदाची माळ यतीन पारेख यांच्या गळ्यात तर उपमहापौरपद रूद्रेश चोडणकर यांना देण्याचा निर्णय ताळगावचे आमदार, शिक्षणमंत्री तथा पणजी विकास आघाडीचे नेते बाबूश मोन्सेरात यांनी जाहीर केला. बाबूश यांच्या नेतृत्वाखाली पणजी विकास आघाडीच्या निवडून आलेल्या १६ नगरसेवकांची बैठक आज ताळगाव येथे झाली. या बैठकीत यतीन पारेख व रूद्रेश चोडणकर यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी नगरसेविका तथा पर्यावरणप्रेमी पॅट्रीशिया पिंटो यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा प्रस्ताव सादर करण्याचाही निर्णय बाबूश यांनी घेतल्याने तो बराच चर्चेचा विषय ठरला आहे.
आज ताळगावात ‘मोन्सेरात व्हीला’ येथे संध्याकाळी ही बैठक झाली. या बैठकीला विजयी नगरसेवकांसह पराजित उमेदवारांनाही आमंत्रित करण्यात आले होते. ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या महापौरपदाचे उमेदवार तथा माजी महापौर अशोक नाईक यांचा पराजय केलेले माजी उपमहापौर यतीन पारेख यांच्याकडे महापौरपदाची धुरा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. उपमहापौरपदाचा ताबा रूद्रेश चोडणकर यांच्याकडे देण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. पणजी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या प्रभागांतील नगरसेवकांकडेच अनुक्रमे महापौर व उपमहापौरपद देण्यामागे बाबूश यांची राजकीय चाल असून पुढील विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही चाल आखल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
पॅट्रीशिया पिंटोंचे मौन
पणजी महापालिकेवर पॅट्रीशिया पिंटो यांना स्वीकृत सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव बाबूश मोन्सेरात यांनी दिला आहे. पॅट्रीशिया पिंटो या माजी नगरसेवक तथा पर्यावरणप्रेमी आहेत. पणजीत व ताळगावातील पुरातन वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी त्यांनी झाडांना मिठी मारण्याचे अभिनव आंदोलनही केले होते. प्रादेशिक आराखडा २०११ विरोधात आंदोलन उभारलेल्या गोवा बचाव अभियानाच्या त्या प्रमुख नेत्या होत्या व त्यांनी बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात टीकेची राळ उठवली होती. आता त्यांनाच महापालिकेवर स्वीकृत सदस्यत्वाची ऑफर देऊन बाबूश यांनी मोठी खेळी खेळली आहे. पणजीतील कचरा समस्यांवर तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्याचेही त्यांनी ठरवले आहे. या प्रकरणी पॅट्रीशिया पिंटो यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. अलीकडेच पर्यावरण खात्यातर्फे घन कचरा व्यवस्थापनासंबंधी एक समिती स्थापन केली असून त्यात पॅट्रीशिया पिंटो यांनी नियुक्ती केली आहे.

No comments: