Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 March, 2011

चारशे चिरे तासणारी खांडोळ्यातील ‘जनी’

• शैलेश तिवरेकर

पणजी, दि.१३
जग झपाट्याने बदलत आहे. बदलत्या जगात माणसातही बदल होत आहे. पूर्वी महिला ही कमजोर मानली जायची. म्हणून ते काम एखादा पुरुष करू शकतो ते कदाचित महिलेला जमणार नाही असे मानले जायचे, पण आज मात्र वेगळा प्रकार दिसत आहे. आजची महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कोणतेही काम करू शकते ज्यात पुरुषाची मक्तेदारी आहे आणि याची अनेक उदाहरणे आहेत. केवळ राजकारण किंवा एखादी नोकरीच नव्हे तर एखाद्या पुरुषाप्रमाणे प्रवासी गाडी चालवणे, भाडोत्री रिक्षा चालवणे, आम्लेट पावाचा गाडा चालवणे, रिक्षातून भाजी विकणे, गवंडी काम करणे असे जे व्यवसाय महिलांच्या आवाक्याबाहेरचे मानले जायचे. तेच व्यवसाय आज महिलाही खंबीरपणे हाताळताना दिसतात. गोवा सरकारतर्फे महिलांच्या कर्तृत्वाची दखल घेत दरवर्षी ‘यशोदामिनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो. परंतु तो पुरस्कार योग्य महिलांपर्यंत पोहोचतो का? की केवळ राजकारण्यांच्या मागे हांजीहांजी करणार्‍यानांच हा पुरस्कार दिला जातो याचे उत्तर शोधावे लागले. आपल्या स्वबळावर आपले वैशिष्ट्य सिद्ध करणार्‍या महिलांना हा पुरस्कार मिळतो का? याचा विचार होणे आवश्यक आहे. कारण गोव्यात अशा अनेक महिला आहेत ज्या खर्‍या अर्थाने ‘यशोदामिनी‘ पुरस्कारासाठी लायक आहेत. अशा स्थितीतही त्यांच्यावर नकळतपणे अन्याय होतो. कारण त्या कधीही आपणहून असा पुरस्कार मिळावा म्हणून पुढे येत नाहीत. शिवाय त्या जे काम करतात त्याचा मोबदला देतानाही त्यांना लुबाडले जाते. अशा महिलांसाठी सरकारने काहीतरी करणे काळाची गरज आहे. अशीच एक महिला म्हणजे खांडोळा बेतकी जल्मीवाडा येथील ‘जनी जल्मी’
एखाद्या तरबेज गवंड्याप्रमाणे जनी गवंडीकाम करते. किंबहुना गेल्या दहा वर्षांच्या गवंडी कामाच्या अनुभवाने या कामात ती माहीर झालेली आहे. चिरे तासणे, सिमेंट काढणे, टाइल्स बसवणे अशी सर्वप्रकारची कामे ती करते. तिच्या या अद्वितीय कर्तृत्वासंदर्भात तिला विचारले. त्यावेळी तिने आपली कथा सांगितली. ती म्हणाली की, आपल्या बालपणातच वडील वारले. घरात आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ. घरची अशी जमीन नसल्याने शेती करणे शक्य नव्हते. म्हणून केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करत असू. कधी कुणाच्या शेतात तर कधी गवंड्यासोबत चिरे उचलण्यासाठीही जात होतो. याच दरम्यान आपण गवंडी काम शिकले आणि गेली दहा वर्षे गवंडी काम करत आहे. सध्या एका ठेकेदाराकडे चिरे तासणे किंवा सिमेंट काढण्याचे काम करते. त्या बदल्यात दर दिवशी रू. १४० एवढे वेतन मिळते.
जनी सांगते की, पण करत असलेल्या कामाच्या मानाने तिला मिळणारा मोबदला हा खूपच कमी आहे. कारण एका दिवसाला आणखी एखाद्याची साथ मिळाल्यास असल्यास ४०० चिरे (एक लोड) तासून काढते. तर सिमेंट काढायचे असल्यास एक खोली पूर्ण करते. आजच्या गवंडी पगाराच्या मनाने तिला मिळणारा मोबदला हा खूपच कमी आहे. याबाबत ती म्हणाली, रोज काम मिळते हेच महत्त्वाचे. नाहीतर खाणार काय? निरागस जनी अगदी साधेपणाने बोलत होती. आम आदमीच्या राज्यात कारागिरांसाठी अनेक योजना आहेत. कला आणि तत्सम गोष्टी वा स्पर्धांसाठी लाखो रुपये पाण्यासारखे खर्च केले जातात. परंतु रक्ताचे पाणी करून पोट भरणार्‍या अशा कष्टकरी महिलांसाठी सरकारने फुल ना फुलाची पाकळी देऊन मदत करावी अशी अपेक्षा यावेळी श्रीमती जनी यांनी व्यक्त केली.
सरकारच्या योजना अनेक आहेत पण त्या अशा गरजूंपर्यंत पोचत नाही. या लोकांना सरकार म्हणजे काय? सरकारच्या योजना काय याचा काहीच पत्ता नाही. कारण अशी माणसे स्वाभिमानी असतात आणि ती कुणापुढे हांजीहांजी करत नाहीत. वास्तविक अशा लोकांची आज सरकारने कदर करत त्यांना मदत करणे गरजेचे आहे, परंतु त्यांच्याकडे कुणाचे लक्षच जात नाही. ही माणसे हलाखीचे जीवन जगत आहेत. एका बाजूने सरकार विविध सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांवर पैशांची उधळण करत आहे तर याच राज्यात जनीसारखी एखादी महिला पोटाची खळगी भरण्यासाठी भर उन्हात अवजड अवजाराने चिरे तासताना दिसते. ‘जो खातो तो त्याला तूप दही नाही त्याला माती कठीण’ असाच हा प्रकार आहे.

No comments: