Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 18 March, 2011

अपहरणप्रकरणी दोघांना अटक

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)
पन्नास लाखांच्या खंडणीसाठी ताळगाव येथून दिल्लीस्थित बिल्डरचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघा संशयितांना आज पणजी पोलिसांनी अटक केली. प्रभाकर नेरुलकर (रा. रेईस मागूस) आणि अविनाश नाईक (रा. बेती वेरे) अशी संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील अन्य संशयित अद्याप फरारी असून अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आलेले नाही.
काल दुपारी सुमारे २ च्या दरम्यान दिल्ली येथील रिअल इस्टेट कंपनीचे संचालक मनोज सिन्हा यांचे ताळगाव येथून अपहरण करण्यात आले होते. मात्र वेळीच प्रसंगावधान ओळखून पणजी जेटीजवळ वाहनातून उडी घेऊन त्यांनी आपली सुटका करून घेतली होती. जखमी अवस्थेत पोलिसांनी त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले होते.
मनोज सिन्हा यांचा ताळगाव येथे एक प्रकल्प सुरू होणार होता. त्यासाठी लागणारी जागा अपहरण करणार्‍या गटातीलच संशयित ‘ब्रोकर’कडून घेण्यात आली होती. परंतु, काही महिन्यांपासून त्यांनी या ब्रोकरशी नाते तोडले होते. मनोज सिन्हा गोव्यात आल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर त्यांचे अपहरण करून पन्नास लाखांची खंडणी घ्यावी आणि त्यांचा खून करावा असा कट आखून त्यांचे अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. मात्र, त्यांचा हा बेत फसला. सध्या संशयितांना पोलिस कोठडीत घेऊन अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. या विषयीचा पुढील तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर करीत आहेत.

No comments: