Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 17 March, 2011

पेडणे बाजाराचे काय होणार?

विरोधकांच्या भूमिकेमुळे आजच्या स्थलांतरावर प्रश्‍नचिन्ह
पेडणे, दि. १६ (प्रतिनिधी)
पेडणे शहराच्या मुख्य रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून दर गुरूवारी भरत असलेला आठवड्याचा बाजार उद्या १७ पासून स्थलांतरित होतो की पुन्हा त्याच ठिकाणी भरतो याकडे समस्त पेडणेवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. पालिका मंडळाने सदर बाजाराचे स्थलांतर करण्याचा ठराव संमत करून घेतलेला असला तरी विरोधकांनी त्यात आडकाठी आणल्यामुळे गुरुवारच्या या स्थलांतरावरचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे.
गोवा मुक्तीनंतर हा बाजार रस्त्यावर भरवला जात आहे. मुख्य रस्त्यावर बाजार भरवला जात असल्याने वाहनचालकांना व जनतेला त्याचा बराच त्रास होतो. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यावरील सदर बाजार स्थलांतरित करावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र बाजाराला आवश्यक ती जागा उपलब्ध होत नसल्याने हा बाजार रस्त्यावरच भरवला जात होता.
दरम्यान, रस्त्यावरच भरणार्‍या बाजारामुळे नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय लक्षात घेऊन या प्रकरणी दि. १० फेब्रुवारी रोजी पालिका मंडळाची महत्त्वाची बैठक नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी डॉ. देशप्रभू, उपनगराध्यक्ष स्मिता कवठणकर, पल्लवी कांबळी, गजानन देसाई व विश्राम गडेकर या पाच जणांनी बाजार स्थलांतरित करण्याच्या ठरावाच्या बाजूने तर विष्णू साळगावकर, माधव शेणवी देसाई, उपेंद्र देशप्रभू व नूतन आरोसकर या चार नगरसेवकांनी बाजार स्थलांतराच्या विरोधात मतदान केले.
विरोध करणार्‍या नगरसेवकांचा एका रस्त्यावरून दुसर्‍या रस्त्यावर बाजाराचे स्थलांतर करण्यास विरोध आहे. याचाच एक भाग म्हणून १० रोजी या विरोधी नगरसेवकांनी येथील काही व्यापार्‍यांची बैठक घेतली व त्यांचाही या स्थलांतराला विरोध असल्याचे सांगितले. जबरदस्तीने स्थलांतर झाल्यास बाजारावर बहिष्कार घालू असा इशाराही त्यावेळी उपस्थित काही व्यापार्‍यांनी दिला होता.
दरम्यान, या संदर्भात नगराध्यक्ष डॉ. देशप्रभू यांच्याकडे संपर्क साधला असता उद्यापासून बाजाराचे स्थलांतर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही जनतेचीच मागणी होती व त्या मागणीची दखल आपण घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जनता, व्यापारी व सर्व नगरसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही केले. या बाजारामुळे वर्षाला साडेचार लाखरुपये कराच्या रूपाने पेडणे पालिकेला मिळत असतात.

No comments: