Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 16 March, 2011

पणजीकरांनी स्वाभिमान अबाधितच ठेवला - पर्रीकर

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी)
ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या ‘मनी व मसल पॉवर’ला पणजीवासीयांनी अजिबात भीक घातली नाही. पणजी मतदारसंघातील विविध प्रभागांतील मतदानाची टक्केवारी पाहता भाजपच्या मतांची ताकद वाढल्याचेच स्पष्ट होते. पणजीवासीयांनी आपल्या स्वाभिमानाला अजिबात तडा जाऊ दिला नसल्याने आपण पणजी महापालिका निवडणुकीच्या जनमताचा आदर करतो, अशी प्रतिक्रिया पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला.
पणजी महापालिकेवर ‘पणजी फर्स्ट’ला सत्तेने थोडक्यात हुलकावणी दिली ही गोष्ट खरी आहे. गेल्यावेळच्या आठ नगरसेवकांची संख्या १२ वर पोहोचली आहे व त्यात खुद्द ताळगावातील दोन ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आल्याने बाबूश यांचा ताळगावचा बुरूज ढासळत असल्याचेच स्पष्ट होते, असा टोलाही पर्रीकर यांनी हाणला. महापालिका निवडणूक निकालाचा थेट संबंध विधानसभा निवडणुकीशी लावण्यास आपण तयार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत मतदार स्थानिक उमेदवारांशी असलेल्या आपल्या संबंधावरून मतदान करतात व त्यामुळे त्यांनी ‘पणजी फर्स्ट’च्या विरोधात केलेले मतदान हे आपल्या विरोधातच आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही. महापालिकेसाठी बाबूश गटाला मतदान केलेले कित्येक मतदार विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदान करणारे आहेत व त्यामुळे या निकालाचा संबंध विधानसभा निवडणुकीशी लावून राजकीय विश्‍लेषण करण्याची चूक कुणीही करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
बाबूश मोन्सेरात हे पणजीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत या गोष्टीचा विनाकारण बाऊ केला जातो आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आपल्याविरोधात कुणीतरी विरोधी उमेदवार असणारच आहे व तो उमेदवार बाबूश किंवा अन्य कुणीही असला तरी आपल्याला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही, असेही ते म्हणाले. आपण पणजी मतदारसंघातूनच पुढील विधानसभा निवडणूक लढवणार, असेही यावेळी पर्रीकर यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, पर्रीकर यांनी यावेळी सादर केलेली आकडेवारी अत्यंत बोलकीच ठरली. पणजी मतदारसंघात गेल्या २००७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेतील प्रभागांत पर्रीकर यांना ५९३० तर कॉंग्रेसचे उमेदवार दिनार तारकर यांना ४५१५ मते प्राप्त झाली होती. यावेळी महापालिका निवडणुकीत पणजीतील प्रभागांत पणजी फर्स्टला ५६३० व बाबूश यांच्या विकास आघाडीला ४५३० मते प्राप्त झाली. सुमारे ११०० मतांची आघाडी ‘पणजी फर्स्ट’ने पणजी मतदारसंघात घेतली. या आकडेवारीनुसार बाबूश मोन्सेरात यांचा पणजीतील मतदारांना विकत घेण्याचा मनसुबा पूर्णपणे धुळीस मिळाल्याचेच स्पष्ट होते व त्यामुळे आपला स्वाभिमान राखून ठेवलेल्या पणजीकरांच्या मतदानाच्या कौलाचे आपण स्वागतच करतो, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

No comments: