Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 18 March, 2011

पेडणे बाजाराचा ‘बाजार’!

स्थलांतर नाहीच - धक्काबुक्की - नगराध्यक्षांविरोधात पोलिस तक्रार
पेडणे, दि. १७ (प्रतिनिधी)
दर गुरुवारी भर रस्त्यावर भरणारा पेडण्याचा आठवड्याचा बाजार स्थलांतरित करण्यास चार विरोधी नगरसेवक व काही व्यापार्‍यांनी कडाडून विरोध केल्याने आज (दि. १७) येथील वातावरण अतिशय तंग बनले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू व माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर यांच्यात आधी शाब्दिक चकमक व नंतर धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर श्री. तोरस्कर यांनी डॉ. देशप्रभू यांच्या विरोधात पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, या सर्व गदारोळात पेडणे बाजाराचे स्थलांतर झाले नाहीच.
पोर्तुगीज काळापासून पेडण्याचा आठवडा बाजार प्रमुख रस्त्यावरच भरवला जात आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि बाजारात येणार्‍या लोकांची विलक्षण गैरसोय होत आहे. हा बाजार स्थलांतरित करावा अशी गेल्या कित्येक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी आहे. विद्यमान नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांनी त्याची गंभीर दखल घेऊन या विषयावर चर्चा करण्यासाठी १० फेबु्रवारी रोजी बैठक बोलाविली होती. या बैठकीला पेडण्याचे विद्यमान आमदार दयानंद सोपटे, पेडणे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर, मामलेदार भूषण सावईकर यांची उपस्थिती होती. त्यावेळी हा बाजार दि. १७ मार्चपासून येथील भारतीय स्टेट बँक ते देवाचा मांगर दरम्यानच्या रस्त्यावर भरविण्याचा ठराव मांडण्यात आला होता. मात्र त्यास विरोधी नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. जोपर्यंत नियोजित बसस्थानकाच्या जागेत या बाजाराला जागा मिळत नाही तोपोर्यंत तो येथेच भरवला जावा, असे त्यांचे म्हणणे होते.
उपजिल्हाधिकार्‍यांचे संशयास्पद वर्तन
पेडणे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांनी १६ रोजी आदेश जारी करून बाजार स्थलांतराच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिस संरक्षणाचा आदेश जारी केला होता. मात्र, आज १७ रोजी सकाळी १० वा. त्यांनी अचानक मामलेदारांना फोन करून सदर आदेश मागे घेतल्याचे मोबाईलवरून कळविले. त्यानुसार तेथे तैनात करण्यात आलेले पोलिस हटवण्यात आले. त्यामुळे वातावरण अधिकच तंग बनले आणि व्यापार्‍यांची एकच धावपळ उडाली. कोणी त्यांना कोर्टाच्या खाली असलेल्या रस्त्यावर बसण्ण्यास सांगत होते तर कोणी त्यांना पूर्वीच्या जागेवरून उठलात तर याद राखा, अशी धमकी देत होते. नगराध्यक्ष डॉ. देशप्रभू सकाळी ६ वाजता बाजाराच्या ठिकाणी आले होते व कोणत्याही परिस्थितीत येथे बाजार थाटू देणार नाही असे त्यांनी व्यापार्‍यांना ठणकावले होते. मात्र नंतर सूर्यकांत तोरस्कर तेथे आले व व्यापार्‍यांना तेथेच बसण्यास प्रोत्साहन देऊ लागले. परिणामी दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. शेवटी हा बाजार पूर्वीच्याच ठिकाणी भरला आणि त्यामुळे रोज होते तशी वाहतुकीची कोंडीही झालीच.

धक्काबुक्कीचा निषेध
नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांनी सूर्यकांत तोरस्कर यांना धक्काबुक्की केल्याच्या प्रकरणाचा विरोधी नगरसेवक उपेंद्र देशप्रभू, विष्णू साळगावकर, माधव शेणवी देसाई व नूतन आरोस्कर यांनी पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी उद्योजक दशरथ महाले व ऍड. मुरारी परब यांचीही उपस्थिती होती.

तेव्हा कोणाचाही विरोध नव्हता..
१० फेबु्रवारी रोजी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत बाजार स्थलांतरित करण्यासंदर्भात मुख्याधिकारी शिवप्रसाद नाईक यांच्या सहीनिशी बाजारातील लहान-मोठ्या व्यापार्‍यांना ३० दिवसांची आगाऊ नोटीस पाठविण्यात आली होती. त्यामध्ये १७ मार्चपासून पेडण्याचा आठवडा बाजार स्थलांतरित होणार असे नमूद करण्यात आले होते. मात्र, व्यापार्‍यांनी त्याविरुद्ध आवाजही उठविला नव्हता किंवा त्यास हरकतही घेतली नव्हती, हे विशेष!

No comments: