Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 15 March, 2011

विकास आघाडीला काठावरचे बहुमत

निसटत्या पराभवांमुळे ‘पणजी फर्स्ट’ची संधी हुकली

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेच्या ३० जागांपैकी २७ जागा प्राप्त करू हा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा दावा पणजीवासीयांनी अखेर सपशेल फोल ठरवला. बाबूश समर्थक पणजी विकास आघाडीला केवळ १६ जागांवरच समाधान मानावे लागले. केवळ काठावरच्या बहुमताच्या जोरावर विकास आघाडीने महापालिकेवर पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित करण्यात मात्र यश मिळवले. भाजप समर्थक ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या पारड्यात १२ तर अपक्ष उमेदवार सुरेंद्र फुर्तादो व रूथ फुर्तादो या दांपत्याने विजय प्राप्त करून महापालिकेवरील आपली घट्ट पकड पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली.
पणजी महापालिका निवडणुकीसाठीची मतमोजणी आज फार्मसी कॉलेज येथे सकाळी १० वाजता सुरू झाली. केवळ एका तासांत सर्व प्रभागांतील निकाल झटापट जाहीर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात मतमोजणीसाठी हाती घेण्यात आलेल्या ताळगावातील एकूण ७ प्रभागांपैकी तीन प्रभागांवर ‘पणजी फर्स्ट’चे उमेदवार निवडून आले व बाबूश गोटात कमालीची अस्वस्थता पसरली. प्रभाग -५ मधून शीतल नाईक, प्रभाग - ७ मधून श्‍वेता लोटलीकर व प्रभाग- १८ मधून रत्नाकर फातर्पेकर या ‘पणजी फर्स्ट’च्या उमेदवारांनी बाजी मारली. दुसर्‍या टप्प्यात पणजीतील प्रभागांची मतमोजणी सुरू झाली. या मतमोजणीवेळी ‘पणजी फर्स्ट’ व विकास आघाडीत जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली. प्रभाग-१४ मधून यतीन पारेख यांनी ‘पणजी फर्स्ट’चे नेते अशोक नाईक यांचा १११ मतांनी पराभव केल्याची माहिती पसरताच बाबूश गोटात पुन्हा चैतन्य पसरले. पणजीतील एकूण १९ प्रभागांपैकी १० ठिकाणी ‘पणजी फर्स्ट’ तर ९ ठिकाणी विकास आघाडीचे उमेदवार विजयी ठरले. ‘पणजी फर्स्ट’चे तीन उमेदवार अत्यंत कमी फरकाने पराजित झाल्याने एकूणच चित्र फिरले व सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा विकास आघाडीकडे गेली. शैलेश उगाडेकर - १६, डियोदिता डिक्रुझ -४ तर मनोज पाटील- ३२ मतांनी पराभूत झाल्याने बहुमताकडे सुरू असलेली ‘पणजी फर्स्ट’ची घोडदौड मंदावली. बाबूश व पर्रीकर यांच्या दोन्ही पॅनलना दणका देऊन अपक्ष उमेदवार सुरेंद्र फुर्तादो व रूथ फुर्तादो यांनी आपले नगरसेवकपद सांभाळण्यात यश मिळवले. विद्यमान नगरसेवकांपैकी मंगलदास नाईक, प्रसाद आमोणकर, उदय मडकईकर, ऍड. अविनाश भोसले तर भाजपचे रूपेश हळर्णकर यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत ‘टूगेदर फॉर पणजी’ या पॅनलची मात्र पूर्णतः दाणादाण उडाली. या गटाचे नेते तथा नगरसेवक ऍड. अविनाश भोसले यांना केवळ ७ मते प्राप्त झाली. दरम्यान, ३० सदस्यीय पणजी महापालिका मंडळावर १६ महिला नगरसेवक निवडून आल्याने पहिल्यांदाच महापालिकेवर महिलांचे वर्चस्व राहणार आहे. गेल्या भ्रष्ट कार्यकाळाचा अनुभव पाहता महिला शक्ती अशा प्रकारांना अजिबात थारा देणार नाही, अशी प्रतिक्रिया नगरसेविका वैदेही नाईक यांनी दिली. प्रभाग क्रमांक १ मधून विकास आघाडीच्या एना रोझा डिसोझा या सर्वाधिक ४९१ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या तर मारीया रिटा परेरा फर्नांडिस या सर्वांत कमी ४ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या.

No comments: