Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 14 March, 2011

कुंडई तपोभूमीवर धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र

• ब्रह्मेशानंदाचार्याच्या हस्ते स्वातंत्रसैनिक व जनतेचाही सन्मान

फोंडा, दि.१३ (प्रतिनिधी)
प. पू. श्री पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या श्रीक्षेत्र तपोभूमी गुरूपीठाचे विद्यमान पीठाधीश्वर श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांची जन्माष्टमी व गोवा मुक्ती सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्यानिमित्त आज (दि.१३) तपोभूमी कुंडई येथे एका व्यासपीठावर धर्मसत्ता आणि राजसत्ता असा अभूतपूर्व असा योग जुळून आला. या सोहळ्यात गोवा मुक्तीलढ्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच तमाम गोमंतकीय जनतेचा प्रातिनिधिक स्वरूपात विद्यमान पीठाधीश्वर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या समारंभाला हिंदू धर्मगुरू आचार्य धर्मेद्रजी महाराज, बौद्ध धर्मगुरू श्री बॅनेगेला उपतिस्सा नायक थेरो, गुरुमाता ब्राह्मीदेवी यांची उपस्थिती लाभली.
स्वातंत्र्यसैनिकांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली आणि चंद्रकांत केंकरे यांचा स्वामींच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. केंकरे आणि श्री. करमली यांनी मनोगत व्यक्त केले.
गोवा मुक्ती सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गोमंतकीय जनतेचा प्रातिनिधिक स्वरूपात प. पू. स्वामींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंह राणे, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री जुझे डिसोझा, आमदार दयानंद सोपटे, आमदार राजेश पाटणेकर, आमदार चंद्रकांत कवळेकर, आमदार प्रताप गावंस, आमदार अनंत शेट, आमदार पांडुरंग मडकईकर, आमदार महादेव नाईक, आमदार वासुदेव गावकर, मंत्री मनोहर आजगावकर, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, पर्यटन मंत्री नीळकंठ हर्ळणकर, आमदार दिलीप परुळेकर, आमदार फ्रान्सिस डिसोझा, आमदार मिलिंद नाईक, आमदार दयानंद मांद्रेकर व इतरांनी सत्कार स्वीकारला.
बौद्ध धर्मगुरू बॅनेगेला नायक थेरो आणि आचार्य धर्मेद्रजी महाराज यांचा सन्मान प. पू. स्वामींच्या हस्ते करण्यात आला.
संप्रदायाच्या बोधचिन्हाचे उद्घाटन प. पू. स्वामींच्या हस्ते करण्यात आले. संप्रदायाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन सभापती प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते करण्यात आले. संप्रदायाच्या सार्थ पूजा विधी पुस्तकाचे प्रकाशन वाहतूकमंत्री ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
राजकीय क्षेत्रातील लोकांना धर्मगुरूंचा आशीर्वाद लाभल्यास प्रदेशाचे प्रगती जलद गतीने होऊ शकते. पद्मनाभ संप्रदायाचे कार्य अलौकिक स्वरूपाचे आहे. व्यसनमुक्ती, संस्कृत पाठशाळेच्या माध्यमातून पुरोहित निर्माण करण्याच्या कार्यामुळे समाजाला नवीन वळण मिळेल. धर्म आणि संस्कृतीच्या प्रगतीसाठी पीठांची गरज आहे, असे श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
पद्मनाभ संप्रदायाने सर्व धर्म व लोकांचा एकाच व्यासपीठावर सन्मान करून सर्व धर्म समभावाचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे, असे मंत्री जुझे डिसोेझा यांनी सांगितले.
संप्रदाय समितीचे अध्यक्ष रामचंद्र नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमस्थळी प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संप्रदायाच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर आपल्या धर्म आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारा एका आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी, आचार्य धर्मेद्रजी महाराज, बौद्ध धर्मगुरू श्री बॅनेगेला नायक थेरो यांचे आशीर्वचन झाले. सूत्रसंचालन बटू ज्ञानेश्वर शर्मा आणि चंद्रशेखर गावस यांनी केले. या सोहळ्याला भाविक, भक्तगण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: