Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 October, 2010

महामार्ग फेरबदल समितीचा २ रोजी विराट मोर्चा

पणजी, दि.२९ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणानिमित्त लोकांनी उपस्थित केलेल्या हरकतींकडे राज्य सरकारकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे येत्या २ नोव्हेंबर २०१० रोजी पणजीतील आझाद मैदानावर विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. दुपारी ३ वाजता आझाद मैदानावरून हा मोर्चा पर्वरी विधानसभा संकुलावर नेण्यात येणार आहे. निवेदने व बैठकांतून मांडलेली भूमिका सरकारला समजत नाही व त्यामुळेच आता रस्त्यावर उतरून आपली भूमिका मांडण्याची वेळ समितीवर ओढवली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी दिली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री फातिमा डिसा, व्यंकटेश प्रभू मोनी, पॅट्रिशिया पिंटो, श्री. वाघेला, अशोक प्रभू व राजाराम पारकर आदी पदाधिकारी हजर होते. केंद्रीय रस्ता परिवहन व महामार्गमंत्री कमलनाथ यांच्याकडून लोकांना हवा तसाच महामार्ग बनेल, असे स्पष्ट करण्यात आलेले असतानाही मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना मोठ्या प्रमाणात वाताहत लावणारा हा आराखडा राबवण्याची नेमकी कोणती घाई झाली आहे? असा खडा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. समितीचा राष्ट्रीय महामार्गाला अजिबात विरोध नाही; परंतु त्यासाठी वेगळा आराखडा तयार करण्यात यावा, असे स्पष्टीकरण श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
"एनएचएआय' व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सत्यस्थितीचा विपर्यास करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. यामुळे शेकडो लोकांना विस्थापित करून व विविध भागांची प्रत्यक्ष फाळणी करून हा महामार्ग उभारून सरकार नेमके कोणाचे हित जपत आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती समिती स्थापन करून मोठा गाजावाजा करून प्रादेशिक आराखडा २०२१ तयार करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाबाबत या आराखड्यात केलेल्या तरतुदीला फाटा देऊन आपल्या मर्जीप्रमाणेच महामार्ग तयार केला जात असेल तर आराखडा मुळात तयारच का केला जातो? तो कचऱ्याच्या टोपलीतच टाका, असा सल्ला पॅट्रिशिया पिंटो यांनी दिला. किनारी भागात आधीच वाहतुकीची कोंडी होते. त्यात राष्ट्रीय महामार्गच किनारी भागातून नेला जात असल्याने तिथे अधिक गोंधळ होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरून आंतरराज्य व अवजड वाहतूक होणार आहे. यामुळे हा महामार्ग प्रत्यक्ष लोकवस्ती नसलेल्या जागेतूनच न्यावा, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गामुळे काही घरांवर गंडांतर येणार आहे व त्यांचाच या प्रकल्पाला विरोध आहे, असा समज कोणीही करू नये. या प्रकल्पाचा फटका प्रत्येक गोमंतकीयाला बसणार असून पुढील तीस वर्षे "टोल' भरावा लागणार आहे, अशी माहिती अशोक प्रभू यांनी दिली.
२ रोजीच्या मोर्चात गोव्यातील समस्त नागरिकांनी सहभागी व्हावे व सध्याच्या महामार्ग आराखड्याला विरोध दर्शवून सरकारला भानावर आणावे, असे आवाहन फातिमा डिसा यांनी केले.

No comments: