Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 27 October, 2010

सर्वमान्य तोडग्यानंतरच महामार्गांचे रुंदीकरण

कमलनाथ यांची ग्वाही
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): देश झपाट्याने प्रगती करत असताना पायाभूत सुविधांची कमतरता भरून काढणे ही काळाची गरज आहे. देशात सर्वत्र सुरक्षित व समाधानकारक रस्ते झालेच पाहिजे, त्या दृष्टीनेच गोव्यातही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण हाती घेण्यात येणार आहे. लोकांची घरे पाडून महामार्गाचे काम पुढे नेण्याची केंद्राची अजिबात इच्छा नाही. यामुळे जनतेच्या हरकती सोडवूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय रस्ता परिवहन व महामार्गमंत्री कमलनाथ यांनी दिली.
माजी केंद्रीयमंत्री तथा अनिवासी भारतीय आयुक्त एदुआर्द फालेरो यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त ताळगावातील समाजगृहात त्यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना कमलनाथ यांनी गोमंतकीयांना हे वचन दिले. देशात वाहन निर्मिती क्षेत्राची वाढ ३७ टक्क्यांनी होत असताना त्यासाठी रस्ते तयार झाले नाही तर काय परिस्थिती होणार याचा विचार करा, असेही कमलनाथ यांनी सुचवले.
या प्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती एदुआर्द फालेरो, मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंह राणे, सत्कार समितीचे निमंत्रक माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सिझर मिनेझीस, उद्योजक नाना बांदेकर, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका व गोवा चेंबरचे उपाध्यक्ष मांगिरीश पै रायकर हजर होते. यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र व रौप्यतबक प्रदान करून कमलनाथ यांच्या हस्ते श्री. फालेरो यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांच्या तैलचित्राचेही अनावरण करण्यात आले.
या सत्कार सोहळ्याला संबोधित करताना कमलनाथ यांनी स्वतःहूनच थेट महामार्गाच्या विषयाला हात घातला. रस्ते बांधकामावरून मतभेद होता कामा नयेत व त्यामुळे महामार्गाच्या नियोजित आराखड्याला विरोध करणाऱ्यांच्या हरकतींवर सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकार गोव्याच्या विकासाला पूर्णपणे सहकार्य करेल व त्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आपल्याकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल, असा शब्द त्यांनी दिला. एदुआर्द फालेरो हे लोकनेते आहेत व त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात आपण काम केल्याने त्यांची क्षमता व कार्यपद्धती जवळून पाहण्याचा योग आपल्याला प्राप्त झाला. जागतिक तापमानवाढीच्या परिषदेवेळी ब्राझील देशाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपण खास एदुआर्द फालेरो यांना पाचारण केले होते, अशी माहितीही कमलनाथ यांनी दिली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी, एदुआर्द अनेक वर्षे केंद्रात राहिले पण त्यांना गोव्याचा कधीच विसर पडला नसल्याचे सांगितले. फालेरो यांच्या यशात त्यांच्या दिवंगत पत्नीचाही मोठा वाटा आहे व या प्रसंगी त्याची आठवण करून देणे महत्त्वाचे ठरेल,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग म्हणून जुवारी नदीवर खास पुल उभारण्याच्या प्रस्तावाला कमलनाथ यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. हा पुल गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी पुल म्हणून ओळखला जाणार आहे. महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होताच गालजीबाग व तळपण पुलांचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले जाईल,असे वचनही त्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या प्रसंगी सभापती प्रतापसिंह राणे, ऍड. रमाकांत खलप, सुभाष शिरोडकर आदींचीही समयोचित भाषणे झाली. सिझर मिनेझीस यांनी स्वागत तर मांगिरीश पै रायकर यांनी आभार मानले. पॅट्रिशिया परेरा सेठी यांनी मानपत्राचे वाचन केले. तत्पूर्वी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कला अकादमीतर्फे काणकोण भागातील लोककलाकारांनी विविधांगी लोकनृत्य व लोककलांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाला पोर्तुगालचे राजदूत तथा दूतावास यांची विशेष उपस्थिती होती. राजकीय, सामाजिक तथा उद्योग समूहातील मान्यवर तथा सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

No comments: