Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 October, 2010

'सीआरझेड'ला प्राणपणाने विरोध करू!

राज्यात मच्छीमार संघटनांची कडकडीत निदर्शने
पणजी व म्हापसा, दि.२९ (प्रतिनिधी): किनारी नियमन कायदा हा किनारपट्टी भागातील नागरिकांना देशोधडीला लावणारा असून शेकडो वर्षे किनारी भागांत राहणाऱ्या भूमिपुत्रांना घराबाहेर काढून धनिकांच्या घशात समुद्रकिनारे घालण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न गोव्यातील मच्छीमार व मच्छीविक्रेते कदापि सफल होऊ देणार नाहीत; रापणकारांचो एकवट, बोटमालक संघटना व इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने गोवेकरांच्या मुळावर येणाऱ्या या कायद्याला प्राणपणाने विरोध करण्यात येईल, असा इशारा आज माजी मंत्री माथानी सालढाणा यांनी दिला.
केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या किनारी नियमन कायद्याला (सीआरझेड) विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतभर आज मच्छीमार संघटनांनी समविचारी संघटनांच्या सहकार्याने आयोजित धरणे आंदोलनाअंतर्गत आज गोव्यातील मच्छीमार, मासे विक्रेते, बोटमालक संघटना, गोयच्या रापणकारांचो एकवट व किनारपट्टी लोक संघटना यांनी संयुक्तपणे राज्यात धरणे आंदोलन केले. पणजी व म्हापशातील टपाल खात्याच्या मुख्य इमारतींसमोर ही निदर्शने करण्यात आली. दोन्ही ठिकाणी माथानींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पणजीतील आंदोलनाला आयटक नेते ऍड. राजू मंगेशकर, प्रसन्ना उट्टगी, मांडवी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष मिनीन आफोन्सो यांच्यासह शेकडो निदर्शक उपस्थित होते.
माथानींनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली व लोकशाहीत लोकांना जे हवे तेच व्हायला हवे असे सांगून पर्यावरणाचा ऱ्हास होणारे प्रकल्प गोव्याच्या माथी मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी सीआरझेड मागे घेण्यासाठी केंद्रावर दबाव आणावा असे प्रतिपादन केले. आयटकचे नेते ऍड. राजू मंगेशकर यांनी किनारपट्टी भागातील लोकांना हाकलून बिगर गोमंतकीयांना पंचतारांकित हॉटेले व इमारती बांधण्यासाठी रचलेले हे षड्यंत्र असल्याचे सांगून सर्वसामान्यांच्या हिताआड येणारा हा कायदा परत घ्यावा असे आवाहन केले. आयटक नेते प्रसन्ना उट्टगी, मांडवी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष मिनीन आफोन्सो व इतर नेत्यांनी "सीआरझेड'ला विरोध करून हा कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे प्रतिपादन केले. या वेळी "सीआरझेड नको नको! गरीब विरोधी सरकारचा निषेध असो !' अशा जोरदार घोषणा देऊन निदर्शकांनी परिसर दणाणून सोडला.
म्हापशातही निदर्शने
दरम्यान, म्हापशातील मच्छीमार बांधवांनीही मासळी मार्केट बंद ठेवून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मासळी मार्केटमधून सरळ चालत जाऊन त्यांनी टपाल कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी सुमारे ५००हून अधिक लोकांची उपस्थिती होती.
ऊठ गोयकाराचे उपाध्यक्ष ऍड. जतीन नाईक यांचे यावेळी मार्गदर्शनपर भाषण झाले. त्यानंतर माथानी सालढाणा यांनीही येथे येऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

No comments: