Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 October, 2010

चार ठिकाणी चोऱ्या

ब्रह्माकरमळीत फंडपेटी फोडली कळंगुटमधून ८० हजार चोरले
शेल्डे येथे २.७ लाखांचे दागिने लंपास काणकोणात ४ दुकाने फोडली

म्हापसा, वाळपई, कुडचडे व काणकोण, दि. २९ (प्रतिनिधी): 'सागर कवच' मोहिमेत व्यस्त असलेल्या सुरक्षा यंत्रणेला जबर आव्हान देत चोरट्यांनी कळंगुट येथील डायसेशियन सोसायटी, ब्रह्माकरमळी येथील मंदिर, शेल्डे येथील घर व
काणकोण भागातील ४ दुकाने फोडली. कळंगुट, शेल्डे व काणकोण येथून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेला असून ब्रह्माकरमळी मंदिरातून किती रक्कम चोरीस गेली, याची माहिती मिळालेली नाही.
नायकवाडा कळंगुट येथील बोवा वेगा कपेलाशेजारी असलेल्या डायसेशियन सोसायटीच्या गोदामातून सुमारे ८० हजारांचा ऐवज पळवल्याची तक्रार झेव्हियर डिसोझा यांनी कळंगुट पोलिस स्थानकात नोंदवली आहे. उपनिरीक्षक हरीष गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायकवाडा येथील कपेलाच्या शेजारी असलेला गोदाम गेल्या काही दिवसांपासून बंद होता. आज तो उघडण्यात आला असता दोन मातीच्या मूर्ती, सात चांदीचे मुकुट, एक चांदीचा क्रूस, स्टीलची ताटे मिळून ८० हजारांचा ऐवज गायब झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
ब्रह्माकरमळी येथील सुप्रसिद्ध ब्रह्मदेव मंदिरात काल रात्री अज्ञातांनी गर्भागृहाचे कुलूप तोडून आतील फंडपेटीतील रक्कम लंपास केली. या घटनेमुळे या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाळपई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराची नित्य साफसफाई करणारे आनंद शेळपकर सकाळी १० वाजता मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी या प्रकाराची माहिती पुजारी संदीप केळकर यांना दिली. दोघांनी शोधाशोध केली असता देवस्थानच्या स्वयंपाकघरात फंडपेटी तर नदीकडे जाणाऱ्या वाटेवर दरवाजाचे कुलूप सापडले. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक यशवंत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला. चोरीस गेलेली रक्कम नेमकी किती आहे, याबद्दल माहिती मिळालेली नाही.
कामणसाय शेल्डे येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरीत सुमारे २.७० लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान ही घटना घडली. यावेळी घरात कोणीच नसल्याचे पाहून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन कपाटे फोडून सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील साखळी व इतर साहित्य मिळून सुमारे २.७० लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अनिता प्रशांत गावस देसाई यांनी तक्रार नोंदवली आहे. सकाळी त्यांची दोन मुले शाळेत गेली होती तर पती आपल्या कामावर गेले होते. अनिता नजीकच्या घरात गेल्या असता ही घटना घडली. या भागात तीन व्यक्ती हेल्मेट घालून फिरत होत्या, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्यातही धामडवाडा येथे अशाच प्रकारे रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात चोरी करण्यात आली होती. यासंबंधी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नगर्से काणकोण येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून नगर्से तसेच कदंब बसस्थानकाजवळील ओंकार इमारतीमधील एकूण ४ दुकाने एकाच रात्री फोडण्यात आली. यात नगर्से येथील एजंसिया रियलची दोन दुकाने, बाबाजी गावकर यांच्या मालकीचे वाईन स्टोअर्स व जनरल स्टोअर्स तर ओंकार इमारतीमधील डिसिल्वा फार्मसी आदी दुकानांचे शटर वाकवून अज्ञातांनी चोरी केली. यावेळी चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागलेली नसली तरी एकाच वेळी चार दुकाने फोडण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणेचे अपयश स्पष्ट होत असल्याच्या प्रतिक्रिया येथून ऐकू येत होत्या. काणकोण पोलिसांनी श्वानपथकाच्या साह्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कोणतेच धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

No comments: