Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 November, 2010

इस्लामच्या नावाने होणारी हिंसा खेदजनक : ओबामा

मुंबई, दि. ७ - "इस्लाम' हा अतिशय महान असा धर्म असून, काही कट्टरतावादी तत्त्वांकडून इस्लामच्या नावाने होणारा हिंसाचार ही खेदजनक बाब आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सध्या भारत भेटीवर असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले असून, अशा तत्त्वांना वाळीत टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
आपसातील मतभेद फक्त हिंसाचाराच्या माध्यमातूनच मिटवले जाऊ शकतात ही संकल्पनाच लोकांनी धुडकावून लावण्याची आज नितांत गरज आहे, असे ओबामा यांनी आज येथील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना सांगितले. या संवादादरम्यान ए. अन्सारी या मुस्लिम विद्यार्थ्याने "जिहाद'बाबत आपली काय प्रतिक्रिया आहे, असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना ओबामा यांनी हे प्रतिपादन केले. इस्लामच्या नावाचा वापर करून निष्पाप नागरिकांना आपले लक्ष्य करण्याची कट्टरवाद्यांची भूमिका पूर्णपणे अयोग्य आहे, असेही ओबामा यावेळी म्हणाले.
पाकिस्तानला आपण दहशतवादी राष्ट्र म्हणून का घोषित करत नाही, अशा एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओबामा म्हणाले की, पाकिस्तानातील सगळ्याच जनतेचा अतिरेकी कारवायांना पाठिंबा नाही. काही कट्टरवादी तत्त्व पाकिस्तानच्या भूमीतून अतिरेकी कारवाया करत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. पाकिस्तान सरकार अतिरेकी कारवाया करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहे. मात्र, हे प्रयत्न समाधानकारक नसल्याचे ओबामा यावेळी म्हणाले. भारताच्या हितासाठी स्थिर आणि प्रगत पाकिस्तानची गरज आहे. पाकिस्तान शांत राहिल्यास संपूर्ण आशिया खंडात त्याचा प्रभाव पडू शकतो. पाकिस्तानला स्थिर करण्यात भारतच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असे माझे ठाम मत आहे, असेही ओबामा यावेळी म्हणाले. एकमेकांच्या धर्माचा आदर करत प्रगती साधण्यात आजच्या युवापिढीची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असेही ओबामा यांनी यावेळी सांगितले.

मिशेलनंतर बोलायला आवडत नाही
"मिशेल ओबामा अतिशय चांगल्या वक्त्या असल्याने त्यांचे बोलणे झाल्यानंतर आपल्याला बोलायला मुळीच आवडत नाही', असे बराक ओबामा यांनी या कार्यक्रमाला सुरुवात करताना सांगितले. "स्वत:वर विश्वास ठेवा आणि आपापल्या समुदायांसाठी मोठमोठी स्वप्न बघा' असे मिशेल ओबामा यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगताना म्हटले. त्यानंतर त्यांनी आपले पती बराक ओबामा यांची ओळख करून दिली आणि त्यांना काही अडचणीत टाकणारे प्रश्न विचारा जेणेकरून त्यांचा आजचा दिवस चांगला जाईल, असे आवाहन मिशेल ओबामा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

दिल्लीत भव्य स्वागत
नवी दिल्ली, दि. ७ ः आपला दोन दिवसांचा मुंबई दौरा आटोपून नवी दिल्लीत दाखल झालेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.
शिष्टाचार बाजूला ठेवून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग स्वत: ओबामा यांच्या स्वागतासाठी जातीने उपस्थित होते. बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांना घेऊन आलेले "एअर फोर्स वन' हे विशेष विमान दुपारी ३.१९ वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. ओबामा विमानातून खाली येताच पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ओबामा यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना मिठी मारली. त्यानंतर आपल्या आलिशान मोटारीकडे रवाना होण्यापूर्वी बराक ओबामा यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी काही काळ चर्चाही केली.
केंद्रीय कंपनी व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद, परराष्ट्र सचिव निरुपमा राव आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत मीरा शंकर हेदेखील ओबामा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.

No comments: