Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 November, 2010

कॉंग्रेसने कलमाडींचे पक्ष सचिवपद काढले

नवी दिल्ली, दि. ९: राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनात अनेकानेक भ्रष्टाचाराची प्रकरणे झाल्याचे आरोप झाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने आज सुरेश कलमाडी यांना संसदीय पक्ष सचिवपदावरून काढून टाकले आहे. कॉंग्रेस संसदीय पक्ष सचिवपदाचा सुरेश कलमाडी यांनी दिलेला राजीनामा ताबडतोब स्वीकारण्यात आलेला आहे, असे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी आज येथे सांगितले.
कॉंग्रेस संसदीय पक्ष सचिवपदाची कागदपत्रे लवकरात लवकर सादर करा, असे कलमाडींना सांगण्यात आले होते. सोनिया गांधी या कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख आहेत. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे व विरोधक राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनात झालेल्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांवर सरकारला धारेवर धरण्याची शक्यता लक्षात घेऊन सोनिया गांधी यांनी कलमाडी यांना राजीनामा देण्यास सांगितले असावे, असा अंदाज आहे.
सुरेश कलमाडी कॉंग्रेस पक्षाचे पुणे मतदारसंघातील खासदार असून मागील महिन्यातच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचेही अध्यक्ष होते. या स्पर्धा संपताच कॉंग्रेस पक्षाने कलमाडींपासून स्वत:ला दूर ठेवणेच पसंत केले. याचाच अर्थ असा की कलमाडी वा भ्रष्टाचाराच्या या घोटाळ्यांत अडकलेल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांना क्लिनचिट देण्यास कॉंग्रेस पक्षही अनुत्सुक आहे.

No comments: