Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 12 November, 2010

गोमेकॉचा एक्सरे विभाग पंधरा दिवसांपासून ठप्प

रुग्णांकडून संतप्त प्रतिक्रिया
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील ("गोमेकॉ') "एक्स-रे' विभाग गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झाला असून "एक्स रे' फिल्म उपलब्ध नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
इस्पितळात रोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना, "एक्स रे'साठी फिल्म नसल्याने सांगून घरी पाठवले जात आहे. त्यामुळे बडा घर पोकळ वासा अशी "गोमेकॉ'ची दारुण अवस्था बनली आहे.
रुग्णांना माघारी पाठवताना त्यांना दूरध्वनी क्रमांकही दिला जात आहे. त्यावर संपर्क साधूनच एक्सरे काढण्यासाठी इस्पितळात येण्याची सूचना केली जात आहे. ऑर्थोपेडीक विभागात येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी "एक्स रे' काढणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या रुग्णांना खाजगी इस्पितळात जाऊन एक्स रे काढावा लागत आहेत.
खाजगी इस्पितळात जाऊन एक्सरे काढणे ज्या रुग्णांना शक्य नाही त्यांना आठ दिवसांनी येण्यास सांगून परत पाठवले जात आहे. एक्सरे फिल्म कधी उपलब्ध होणार याची कसलीच माहिती तेथील अधिकाऱ्यांना नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. टीबी इस्पितळ, मनोरुग्ण इस्पितळातील रुग्णांनाही "गोमेकॉ'तच "एक्सरे' काढण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे त्या रुग्णांनाही "एक्सरे' न काढताच माघारी फिरावे लागत आहे.
इस्पितळाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता फिल्म कधी येणार याबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नाही, असे उत्तर यावेळी देण्यात आले. याठिकाणी केवळ आपत्कालीन "एक्स रे'च काढले जात आहेत. अन्य रुग्ण कोठून एक्सरे काढून आणतात याबद्दलही आम्हाला माहीत नाही, असे त्या व्यक्तीने सांगितले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यापासून या विभागातील एक्सरे फिल्म चोरीला जात होत्या. सदर फिल्म तेथून कोण लंपास करत होते याचा उलगडा अद्याप झालेला नसल्याने नवीन फिल्म खरेदी करण्यात आल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वेर्णा येथील एका कंपनीकडून या फिल्म विकत घेतल्या जातात.

No comments: