Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 12 November, 2010

भाजपच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब

म्हापसा नगराध्यक्षपदी सुधीर कांदोळकर
उपनगराध्यक्षपदी विजेता नाईक

पेडणे- डॉ.वासुदेव देशप्रभू(नगराध्यक्ष), सौ.स्मिता कवठणकर (उपनगराध्यक्ष)
कुडचडे-अलिफा फर्नांडिस (नगराध्यक्ष), बाबूराव फट्टू देसाई(उपनगराध्यक्ष)

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): म्हापसा पालिकेवर अखेर भाजप समर्थक गटाने बाजी मारून आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे.नगराध्यक्षपदाचे भाजप समर्थक उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी आपले प्रतिस्पर्धी सुभाष कळंगुटकर यांच्यावर एका मताची आघाडी घेत हे पद खिशात टाकले. श्री.कांदोळकर यांनी आठ तर श्री. कळंगुटकर यांना सात मते मिळाली. उपनगराध्यक्षपदी विजेता नाईक यांनी नऊ विरुद्ध सहा मतांनी दीपक म्हाडेश्री यांच्यावर मात केली.
राज्यातील अकरा पालिकांपैकी आठ पालिकांवरील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज उर्वरित तीन पालिकांवरील या पदांसाठीची निवडणूक आज झाली.पेडणे पालिकेवरील डॉ.वासुदेव देशप्रभू यांनी आपले बलस्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांनी नगराध्यक्षपदासाठीचे आपले प्रतिस्पर्धी उपेंद्र देशप्रभू यांच्यावर ६ विरुद्ध ३ मतांनी मात केली.उपनगराध्यक्षपदासाठी स्मिता कवठणकर यांची ६ विरुद्ध ३ मतांनी निवड झाली. कुडचडे पालिकेवर अलिफा फर्नांडिस यांनी आपल्या प्रतिस्पर्धी जास्मीन ब्रागांझा यांच्यावर ७ विरुद्ध ५ मतांनी विजय मिळवला तर बाबूराव फट्टू देसाई यांनीही ७ विरुद्ध ५ मतांनी विठोबा प्रभूदेसाई यांच्यावर मात करून उपनगराध्यक्षपद प्राप्त केले.

No comments: