Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 November, 2010

गोव्यात यंदाही पुन्हा एकदा सनबर्न पार्टी

"फेसबुक'वर जाहिरातबाजी सुरू

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - दरवर्षी वादग्रस्त ठरणाऱ्या "सनबर्न' पार्टीचे येत्या महिन्यात गोव्यात आयोजन करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या बहाण्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या पार्टीत अमली पदार्थाचा आणि मद्याचे पाट वाहतात. त्यामुळे नेहमीच ही पार्टी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरते. तरीही राज्यातील सरकार मात्र या पार्टीच्या आयोजनाला "उदार अंतःकरणाने' परवानगी देते. गेल्या वेळी याच पार्टीत "ड्रगचा ओव्हर डोस' झाल्याने दिल्लीच्या मेहा बहुगुणा या तरुणीचा मृत्यू झाला होता.
यंदा मावळत्या वर्षाला निरोप देण्याच्या बहाण्याने २७ ते २९ डिसेंबरदरम्यान या पार्टीचे कांदोळी येथे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी आयोजकांनी संकेतस्थळावरून मोठ्या प्रमाणात तरुण तरुणींशी संपर्क साधता येईल अशा "फेसबुक'वर जाहिरातबाजी सुरू केली आहे. या पार्टीत देशभरातील तरुण तरुणी सहभागी होतात. अनेक तरुण तरुणी कुटुंबातील सदस्यांना कोणतीही चाहूल न लागू देता या पार्टीत "रम'तात. पार्टीच्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी प्रतिव्यक्ती ८०० रुपये प्रवेश शुक्लही ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे पोलिस पहाऱ्यात ही पार्टी आयोजिली जाते. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या "पॅडलर"वर कोणतीच कारवाई होत नाही. गेल्या वर्षी अमली पदार्थविरोधी पथकाने या पार्टीच्या ठिकाणी कडक पहारा ठेवला होता. मात्र ड्रगच्या अतिसेवनाने तरुणीचा मृत्यू झालाच. त्यामुळे अमली पदार्थ विरोधा पथकाच्या व्यूहरचनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ज्याठिकाणी या पार्टीचे आयोजन केले जाते त्याच्या बाहेर छोटे स्टॉल उभारून तेथे शीतपेये आणि खाण्याचे पदार्थ ठेवले जातात. मात्र, त्याठिकाणी सांकेतिक भाषेत अमलीपदार्थांचीच प्रामुख्याने विक्री केली जाते.
एलएसडी, हाशिश, हेरॉईन, कोकेन, एक्सटसी, चरस आदी अमलीपदार्थ तेथे सहजगत्या उपलब्ध केले जातात. या ड्रगच्या नशेत कर्णकर्कश आवाजात "ट्रान्स संगीतावर' तरुण तरुणी धागडधिंगा घालतात. ७२ तास ही पार्टी रंगते! "इंडिया टुडे' या नियतकालिकाने गोव्यात सुरू असलेल्या ड्रग आणि वेश्याव्यवसायावर नुकताच प्रकाश टाकला आहे. त्यामुळे राज्य सरकार या पार्टीच्या आयोजनाबद्दल कोणती भूमिका घेणार याकडे दक्ष गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी याच पार्टीत ड्रगच्या अतिसेवनाने दिल्लीच्या एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची भूमिकाही यावेळी महत्त्वाची ठरणार आहे.

No comments: