Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 November, 2010

'माहिती हक्क कायदा हे ब्रह्मास्त्र'

निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा यांचा सत्कार
पणजी, दि.१२ (प्रतिनिधी): माहिती हक्क कायदा हा भारतीय लोकशाहीने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले "ब्रह्मास्त्र' आहे. प्रशासकीय तसेच राजकीय भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी या अस्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर करून भारतीय लोकशाही बळकट करण्याचे आवाहन माहिती हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचा प्रथम आदेश काढणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा यांनी आज येथे बोलताना केले. गोवा माहिती हक्क संघटने (आरटीआय फोरम गोवा) तर्फे गोवा पीपल फोरम, रुद्रेश्वर पणजी, गोवा इंटरनॅशनल सेंटर, गोवा श्रमिक पत्रकार संघ (गुज), गोवा हितराखण मंच, गोवा महिला वकील संघटना व युथ हॉस्टेल यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात अजित शहा यांचा गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी. डी. कामत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गोवा पीपल फोरमचे ऍड. सतीश सोनक, इंटरनॅशनल सेंटरच्या संचालक नंदिनी सहाय, गोवा महिला वकील संघटनेच्या निमंत्रक किशोरी फुग्रो, गोवा हितराखण मंचाचे प्रशांत नाईक, रुद्रेश्र्वर पणजीचे देवीदास आमोणकर, गोवा युथ हॉस्टेलचे आश्विन तोंबट, माहिती हक्क फोरमचे अध्यक्ष शशी कामत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ऍड. सोनक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नंदिनी सहाय यांनी अजित शहा यांच्या कार्याचा आढावा घेतला.
या प्रसंगी बोलताना जी. डी. कामत यांनी शहा यांच्या कार्यापासून गोव्यातील वकिलांनी स्फूर्ती घेऊन आपल्या कारकिर्दीत यश प्राप्त करण्याचे आवाहन केले. रामशास्री बाण्याचे न्यायमूर्ती म्हणून प्रसिद्ध असलेले व माहिती हक्क कायद्याच्या अंमलबजावणी आदेशामुळे देशभरातील लोकांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या शहा यांचे सोलापूर हे जन्मगाव प्रसिद्धीच्या झोतात आले. माहिती हक्काअंतर्गत मागितलेली माहिती देण्यास होणाऱ्या विलंबाबाबत खंत व्यक्त करताना "जनसुनवाई'द्वारे गावागावांत माहिती हक्काबाबत जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सुद्धा माहिती हक्काबाबत चर्चा करून भारतीय लोकशाहीची तारीफ केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहा यांनी माहिती हक्क कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन प्रवीण सबनीस यांनी केले. प्रशांत नाईक यांनी आभार मानले.
----------------------------------------------------------
आज शहा यांच्याशी खुली चर्चा
माहिती हक्क कायद्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी दि.१३ व दि.१४ रोजी इंटरनॅशनल सेंटर दोनपावला येथे न्यायमूर्ती अजित शहा यांच्याशी खुली चर्चा करण्याचा कार्यक्रम गोवा माहिती हक्क संघटनेने आयोजित केला आहे. सर्वांना या चर्चासत्रात भाग घेता येईल. दि.१३ रोजी सकाळी ९.३० वा. हा कार्यक्रम सुरू होईल.

No comments: