Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 November, 2010

संशयास्पद बांगलादेशीला नौदल परिसरातून अटक

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): वास्को येथील नौदलाच्या हद्दीत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या २५ वर्षीय बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव रेहमान नावशीर असे असून त्याला केवळ बांगलादेशी भाषा येत असल्याचे तो सांगत असल्याने त्याची चौकशी करण्यास पोलिसांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच, आपण वेडा असल्याचेही तो भासवत असल्याने सध्या त्याची रवानगी सडा तुरुंगात रवानगी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नौदल, पोलिस आणि तटरक्षक दलाने "सागर कवच' अंतर्गत घेतलेल्या सुरक्षेच्या आढाव्यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या काही दिवसांपूर्वीच या बांगलादेशी तरुणाला अटक करण्यात आले होते, पोलिसांनी त्याबाबत गुप्तता पाळली होती. दि. ३१ ऑक्टोबर रोजी नौदल पोलिसांनी त्याला आपल्या हद्दीत फिरताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दि. १ नोव्हेंबर रोजी त्याला हार्बर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्याकडे भारतातील वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे. नौदलाचे अधिकारी सौरभ मुखर्जी यांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने आणि गुन्हा अन्वेषण विभागाने संशयित रेहमान नावशीर याची कसून चौकशी केली आहे. परंतु, त्याच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळाली आहे, हे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी त्याच्या अटकेच्या माहितीबद्दल गुप्तता पाळल्याने त्याला नेमके कधी अटक करण्यात आली होती, याबद्दलही शंका निर्माण झाली आहे.
याविषयीचा अधिक तपास हार्बर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशल देसाई करीत आहेत.

No comments: