Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 November, 2010

युनोच्या सुरक्षा समितीत भारत हवाच

अमेरिकेच्या पाठिंब्याची ओबामांकडून निःसंदिग्ध ग्वाही

नवी दिल्ली, दि. ८ - भारत हा विकसनशील देश नसून, तो प्रगत देशांच्या रांगेत येऊन बसला आहे. येथील लोकशाही अत्यंत परिपक्व असून, विविधतेतही एकता राखताना, आपला सर्वांगिण विकास करण्याची भारताची धडपड प्रसंशनीय आहे, अशी स्तुतिसुमने उधळताना, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताचा कायम सदस्य म्हणून समावेश व्हावा, यासाठी अमेरिका सहकार्य देण्यास उत्सुक आहे, असे निःसंदिग्ध प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतीय संसद सदस्यांना संबोधित करताना केले. महात्मा गांधी, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भारतातील दिग्गज नेत्यांचे स्मरण करून ओबामा यांनी केलेल्या ओघवत्या भाषणाने सारे संसदगृह जणू थरारून गेले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना शिक्षा व्हायलाच हवी, असे ठामपणे नमूद करून ओबामा म्हणाले की, दहशतवादविरोधी लढाईत भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा साथीदार आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर कारवाई व्हायलाच हवी. त्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न अमेरिका करेल. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला महात्मा गांधींचा उल्लेख करून ओबामा म्हणाले की, मी आज तुमच्यासमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून उभा आहे. मला इथपर्यंत पोचण्यासाठी गांधीजींच्या विचारांनी कायमच प्रेरणा दिली आहे.
तत्पूर्वी एकत्रित चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना,"चर्चा व दहशतवादाला समर्थन या दोन गोष्टी एकाच वेळी सुरू राहू शकत नाहीत,' असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले. पाकिस्तानबरोबरच्या संबंधांवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मनमोहनसिंग म्हणाले,""स्थिर व समृध्द पाकिस्तान केवळ भारताच्याच दृष्टीने लाभदायक नाही तर दक्षिण आशिया व संपूर्ण जगाच्याही फायद्याचा आहे. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधल्या तरच सर्व मुद्यांवर चर्चा होऊ शकते.''
हैदराबाद हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यात जवळपास ७५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. काश्मीर मुद्यावर बोलताना ओबामा म्हणाले, हा मुद्दा दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, असे अमेरिकेला वाटते. या दोन्ही देशांनी इच्छा व्यक्त केल्यास याप्रकरणी अमेरिका मदत करण्यास तयार आहे, असे ओबामा म्हणाले. काश्मीर समस्येवर अमेरिका आपला तोडगा थोपवू इच्छित नाही, यावर जोर देत ओबामा म्हणाले की, मला असे वाटते की, आपसातील तणाव कमी व्हावा, असे भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना वाटत आहे. मला आशा आहे की येत्या काळात दोन्ही देश या दृष्टीने पावले उचलतील.
भारत व पाकिस्तान संबंधांवरील चर्चेसह ओबामा व मनमोहनसिंग यांनी द्विपक्षीय व जागतिक मुद्यांसह अनेक मुद्यांवर चर्चा केली. तसेच आंतरिक सुरक्षा, भारतीय कंपन्यांवर टाकण्यात आलेले निर्बंध मागे घेणे, नागरी अणुक्षेत्रात संशोधन केंद्र स्थापन करणे यासह अनेक क्षेत्रात सहकार्य करण्यावर या दोन्ही नेत्यांनी संमती व्यक्त केली. भारताला देण्यात यावयाच्या तंत्रज्ञानावरील निर्यात निर्बंध मागे घेणे व अणुइंधन व इतर सामग्री पुरवठा करणाऱ्या गटातील भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा देण्याच्या गोष्टीचे भारताने स्वागत केले आहे. हवामानाचा अंदाज या क्षेत्रातील संशोधनासाठी या दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
या दोन नेत्यांमधील चर्चेदरम्यान पाकिस्तानचा मुद्दाच प्रामुख्याने चर्चिला गेला. भारताने पाकिस्तानसंदर्भात आपल्या ज्या शंका होत्या त्या अमेरिकेसमोर व्यक्त केल्या. पाकिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधात जी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालविली जात आहे त्यासंदर्भात अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे भारताने म्हटले.
कुणाचा रोजगार हिसकावयाचा नाही
आऊटसोर्सिंगच्या मुद्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताला कुणाचा रोजगार हिसकावयाचा नाही. आऊटसोर्सिंगमुळेच अमेरिकेची उत्पादन क्षमता वाढली आहे. यासंदर्भात अमेरिकेला जी भीती वाटत आहे ती निराधार आहे, असे भारताने म्हटले आहे. उलट, आर्थिक क्षेत्रात जर या दोन्ही देशांतील सहकार्य वाढले तर त्यामुळे दोन्ही देशांना त्याचा लाभच होईल, याकडे अमेरिकन नेत्यांचे लक्ष वेधण्यात आले.
आपल्या भारत दौऱ्यामागील उद्देशावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात बराक ओबामा म्हणाले की, भारतातून आपण आपल्या देशात ५० हजार रोजगार घेऊन जात आहो. या प्रचारामागचा उद्देश हा आहे की, आपण भारतात इतके दिवस का थांबलो, हे अमेरिकन लोकांना कळले पाहिजे.
अमेरिकन कॉँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहात ओबामा यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाला जोरदार धक्का बसलेला आहे. या पक्षाने आपले बहुमत गमावलेले आहे. अमेरिकेच्या आर्थिक स्थितीवरून व ओबामांच्या आर्थिक नीतीवर लोक नाराज आहेत व टीकाही करत आहेत. अमेरिकेतील वाढती बेरोजगारी व खराब आर्थिक स्थितीमुळे लोक त्रस्त आहेत, हे येथे उल्लेखनीय. ही सर्व स्थिती बदलण्यासाठी ओबामांनी भारत दौरा आखला व आपल्या दौऱ्यादरम्यान भारतीय कंपन्यांबरोबर जवळपास १० अब्ज डॉलर्सचे (४४ हजार कोटी रुपये) २० करार केले. अमेरिकेकडून सी-१७ जातीची १० मालवाहू विमाने विकत घेण्याचा जो निर्णय भारताने घेतला आहे त्याचेही ओबामा यांनी यावेळी स्वागत केले. यामुळे अमेरिकेत २२ हजार रोजगार निर्माण होतील. नागरी अणु कराराच्या अंमलबजावणीसंदर्भात तसेच स्वच्छ तंत्रज्ञानातील सहकार्यावरही या दोन नेत्यांची चर्चा केली. व्यापार बंधने दूर करण्यावरही या दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. या क्षेत्रातील संरक्षण नीती दोन्ही देशांना लाभदायक राहणार नाही, याकडे मनमोहनसिंग यांनी ओबामांचे लक्ष वेधले.
भारत एक जागतिक आर्थिक महासत्ता झालेला आहे, असे सांगून ओबामा पुढे म्हणाले, भारताला आता पूर्व आशिया व तसेच उर्वरित जगासंदर्भातही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावयाची आहे. सध्याच्या वास्तवतेचे प्रतिबिम्ब पडण्यासाठी युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटनांचे सहकार्य घेण्याच्या गरजेवरही या दोन नेत्यांनी चर्चा केली.
राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण भारत दौरा करण्याचा निर्णय घेतला होता. आपला हा तीन दिवसांचा दौरा इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत सर्वात जास्त दिवसांचा होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताबरोबरची मैत्री अमेरिकेसाठी महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून राष्ट्राध्यक्ष ओबामा म्हणाले, माझ्या शब्दांकडे बघू नका; माझ्या कृतीकडे बघा.

No comments: