Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 8 November, 2010

दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करू : भाजप

नवी दिल्ली, दि. ७ - अमेेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर चर्चा करण्याची वेळ येईल त्यावेळी कोणकोणते मुद्दे उपस्थित करावयाचे यासंदर्भात आज भाजपाच्या संसदीय गटाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता अरुण जेटली, वरिष्ठ नेते जसवंतसिंग, यशवंत सिन्हा, मुरलीमनोहर जोशी सहभागी झाले होते.
जवळपास दोन तास चाललेल्या या चर्चेत ओबामा व सुषमा स्वराज यांच्यात सोमवारी होणाऱ्या बैठकीत भाजपाची भूमिका काय राहील, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानसमर्थित दहशतवाद, भारत व तिसऱ्या जगातील इतर देशांप्रति अमेरिकेची भूमिका, आऊटसोर्सिंग व अमेरिकेत जाऊन तेथे काम करणाऱ्या तेथील भारतीय तंत्रज्ञांना देण्यात यावयाच्या व्हिसा मुद्याला ओबामांच्या भेटीत प्राधान्य दिले जाणार, असे दिसत आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, "अतिथी देवो भव' ही आमच्या देशाची परंपरा असल्याने जोपर्यंत ओबामा आमच्या देशात आहेत तोपर्यंत आम्ही कोणतेही वक्तव्य जारी करणार नाही.
ओबामा यांनी काल शनिवारी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये केलेल्या भाषणात पाकिस्तानचा साधा उल्लेखही न केल्याबद्दल पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ओबामा यांनी केलेले वक्तव्य व भारताच्या परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांनी दिलेले वक्तव्य यात फारच अंतर दिसून येते, याकडे रुडी यांनी लक्ष वेधले होते. ओबामा यांच्या भारत दौऱ्याचा उद्देश दोन देशांमधील संबंध सुधारणे हा आहे, असे वक्तव्य निरुपमा राव यांनी केले होते परंतु दुसरीकडे ओबामा यांनी तर आपल्यासोबत व्यापारी धोरणाचा मुसदा आणला आहे, असे रुडी म्हणाले.

No comments: