Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 13 November, 2010

सांग्रेसला दाखवले काळे झेंडे

देशप्रेमी नागरिक समितीची निदर्शने
वास्को, दि. १२ (प्रतिनिधी): पोर्तुगीज राजवटीने गोव्यातील जनतेवर केलेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल लेखी माफी मागावी. तसेच, गोव्यात असलेली "फुंदासाव ओरीएंत' ही संस्था दहशतवादी कारवायांत गुंतल्याची शक्यता व्यक्त करून या संस्थेला पैशांचा पुरवठा कुठून होतो, याची दक्षता खात्याने त्वरित चौकशी करावी, अशी जोरदार मागणी आज "देशप्रेमी नागरिक समिती'तर्फे राजू वेलिंगकर यांनी केली.
आज सकाळी मुरगाव बंदराच्या धक्क्यावर लागलेल्या "एनआरपी सांग्रेस' या पोर्तुगीज जहाजाच्या आगमनाच्या विरोधात समितीने काळे झेंडे दाखवून निदर्शने करताना "सांग्रेस चले जाव'च्या घोषणा दिल्या. पोर्तुगिजांनी गोव्यावर आपल्या राजवटीचे काळे ढग पसरविल्यास पाचशे वर्षे पूर्ण होत आहे. हा काळ साजरा करण्यासाठी हे जहाज गोव्यात दाखल झाल्याचे समितीने नजरेस आणून देत त्याला मान्यता दिल्याबद्दल गोवा सरकारचा निषेध करण्यात आला. मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या मार्गावर समितीच्या सदस्यांनी एकत्र येऊन या जहाज तसेच गोवा सरकारच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच गोवा युवा मंचाच्या सदस्यांनी येथे उपस्थिती लावून समितीला पाठिंबा दर्शविला.
पोर्तुगिजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले, त्या आठवणी साजऱ्या करण्यासाठी हे जहाज गोव्यात आले आहे. ही गोमंतकीयांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. पोर्तुगिजांनी केलेला अत्याचार आजची पिढीही विसरू शकत नसल्याचे यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
गोवा सरकारने या जहाजाला गोव्यात येण्यास मान्यता देऊन निर्लज्जपणाचे दर्शन घडवले आहे. आपल्या शौर्याचा क्षण येथे साजरा करण्यासाठी आलेल्या या जहाजाला लवकरात लवकर येथून परत पाठवण्याची गरज व्यक्त करताना, जखमेवर मीठ चोळणाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशप्रेमींची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी श्री. आर्लेकर यांनी केली.
"सांगे्रस' जहाजावरील कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, गोमंतकीयांचा विरोध पाहून त्यांनी हजेरी लावण्यास नकार दिला. यातच आमचा अर्धा विजय झाल्याचे "देशप्रेमी नागरिक समिती'चे निमंत्रक आनंद शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, पोर्तुगीज नौदलाचे "सांग्रेस' जहाज आज सकाळी १०.४५ च्या सुमारास बंदरात दाखल झाल्यानंतर गोव्यात असलेले पोर्तुगीज काऊंसल जनरल डॉ. आंतोनियो साबिदो कॉस्ता यांनी जहाजाचे प्रमुख प्रोयेंसा मेंडीस यांना शुभेच्छा देऊन जहाजाचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याबरोबर भारतीय नौदलाचे अधिकारी कमांडर प्रमोद माथूर उपस्थित होते.
मुरगाव बंदरात दाखल झालेल्या पोर्तुगीज नौदलाच्या सदर जहाजाचे १९३७ सालात अनावरण करण्यात आले होते. ८९.५ मीटर लांबीच्या या जहाजाचे वजन १८०० टन आहे. गोवा काबीज करण्यासाठी ज्या प्रकारे शिडांचे जहाज गोव्यात आले होते तसाच याचा आकार असून ८ फेब्रुवारी १९६२ साली हे जहाज पोर्तुगिजांच्या ताफ्यात दाखल करण्यात आले होते. १५ जानेवारी पासून सदर जहाज विविध देशांच्या सफरीवर निघालेले असल्याची माहिती जहाजाचे प्रमुख मेंडीस यांनी दिली.

No comments: