Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 November, 2010

प्रदूषण नियंत्रण मंडळाची गवाणे खाणीला नोटीस

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या गवाणे येथील वादग्रस्त खाणीला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच "कारणे दाखवा' नोटीस बजावल्याने प्रत्यक्षात यापुढे कोणती कारवाई केली जाते याकडे सत्तरीवासीयांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गवाणे येथील "आयर्न ओर माईन्स' या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच कारणे दाखवा नोटीस पाठविली असून, सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे. "वॉटर ऍक्ट' ३३ (ए) कलमानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे.
आंबेली-सत्तरी येथील मनोहर वझे व गावातील अन्य रहिवाशांनी वाळपईच्या कृषी कार्यालयात याबाबत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार गवाणे येथील खाणीच्या मातीमुळे त्या परिसरातील शेती व नाल्याची मोठी हानी झाली आहे. ही तक्रार शेती खात्याने प्रदूषण मंडळाकडे पाठविल्यानंतर त्यासंदर्भात चौकशी सुरू केली. २७ सप्टेंबर रोजी मंडळाने गवाणे, आंबेली भागाची तपासणी केली असता शेती व नाल्यांत मोठ्या प्रमाणात खनिजमिश्रित माती आढळली. प्रदूषणाचा हा प्रकार उघड झाल्यामुळे मंडळाने ३ नोव्हेंबर रोजी खाण कंपनीला नोटीस जारी केली आहे. या कारवाईमुळे या परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील कारवाई काय केली जाते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

No comments: