Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 November, 2010

"इफ्फी'चा प्रमुख पाहुणाच ठरत नाही!

सलमान खान, अक्षय खन्ना यांची नावे चर्चेत

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - सलमान खान व अक्षय खन्ना या अभिनेत्यांची नावे यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी निवडण्यात आली आहेत; परंतु ते चित्रीकरणात व्यस्त असल्याने त्यांच्याकडून ठोस शब्द मिळालेला नाही. साहजिकच महोत्सवाचा प्रमुख पाहुणा काही ठरत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
यंदाच्या "इफ्फी'बाबत राज्य सरकारची कोणतीच तयारी झाल्याचे दिसत नसल्याने आता सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मोठ्या विश्वासाने "इफ्फी' आयोजनाची जबाबदारी सोपवलेले पदाधिकारी आपल्या वैयक्तिक कामांसाठी विदेश दौऱ्यांत मश्गूल आहेत. "इफ्फी' ला आता अवघेच काही दिवस बाकी राहिलेले आहेत व त्यात तयारीच्याबाबतीत काहीही प्रगती झाली नसल्याने कामत यांची झोपच उडाली आहे. गेले तीन दिवस "इफ्फी' आयोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्याचा सपाटाच मुख्यमंत्र्यांनी लावला असून त्यांना स्वतःच लक्ष देणे आता भाग पडले आहे.
"इफ्फी' महोत्सव हॉटेलसाठी "बीच रिसोर्ट' ची अट राज्य सरकारला चांगलीच भोवली आहे. एकीकडे "इफ्फी' हॉटेलची शोधाशोध सुरू आहे तर दुसरीकडे निविदेत भाग घेतलेल्या एकमेव "हॉटेल ताज विवांता' कडून उद्या ११ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याची अट सरकारला सादर केली आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळते. "इफ्फी' निमित्त रस्त्यांची डागडुजी,रंगरंगोटी आदी कामेही रेंगाळली आहे व त्यामुळे ही कामे तातडीने हातात घ्यावी लागणार आहेत.एकाही निविदेवर अद्याप अंतिम निर्णय होत नसल्याने आयोजनाचा घोळ निर्माण झाला आहे. प्रत्येक निविदेत "इफ्फी' समितीवरील कुणा ना कुणाचे हित लपले आहे व त्यामुळे या निविदांवर निर्णय होत नाही,अशी चर्चा गोवा मनोरंजन संस्थेच सुरू आहे. हॉटेलचे नाव निश्चित होत नसल्याने छपाईचे काम हाती घेता येत नाही. "इफ्फी' च्या प्रत्येक छपाई साहित्यावर हॉटेलचे नाव बंधनकारक आहे. त्यामुळे छपाईचे कामही रखडले आहे. निविदाप्रकरणी आज काही पत्रकारांनी मुख्यमंत्री कामत यांना छेडले असता येत्या दोन दिवसांत निर्णय होईल असे सांगताना या दिरंगाईचे खापर पावसावर फोडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
लघु चित्रपट केंद्राचा घोळ
गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी सुरू केलेल्या लघु चित्रपट केंद्रावरून बराच वाद निर्माण झाला आहे. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो व त्याला पुरस्कर्ता मात्र मिळत नाही,अशी तक्रार टीकाकारांकडून सुरू असल्याने यावेळी मात्र या केंद्राला पाठिंबा देणाऱ्यांकडून बरीच शक्कल लढवण्यात आली आहे. यंदा या केंद्रासाठी "किंगफिशर' कंपनीकडून २५ लाख पुरस्कृत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मुळात प्रत्येक "इफ्फी'त किंगफिशर कंपनी २५ ते ३० रुपये पुरस्कृत करीत असते परंतु यावेळी मात्र कार्यकारी समितीच्या काही सदस्यांनी ही रक्कम लघु चित्रपट केंद्रासाठी पुरस्कृत केल्याचे सांगून या केंद्राचा प्रचार करीत आहेत,अशी माहिती मिळाली आहे.

No comments: