Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 November, 2010

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली, दि. १०- महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर आज (बुधवार) सकाळी शिक्कामोर्तब झाले; तर उपमुख्यमंत्रिपदाची माळ राष्ट्रवादीचे . अजित पवार यांच्या गळ्यात पडली आहे. उद्या ११ तारखेला सकाळी ११ वाजता दोन्ही नेत्यांनी शपथविधीचा मुहूर्त साधण्याचे ठरवल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी रात्री कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवडीचे अधिकार सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आज सकाळी केंद्रीय निरीक्षक प्रणव मुखर्जी, ए. के. अँटोनी, पृथ्वीराज चव्हाण यांनी '१० जनपथ'वर जाऊन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांनी मुखर्जी, अँटोनींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला. त्यानंतर, मुखर्जी यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली.
तत्पूर्वी, आदर्श गृहरचना गैरव्यवहार प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली होती. संसदेचे कामकाज संपताच कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, मुखर्जी आणि ए. के. अँटनी यांची चर्चा झाली. त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत होती. मात्र, चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. आज सकाळी सोनिया गांधी यांनी मुखर्जी, अँटोनींशी चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून चव्हाण यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक प्रफुल्ल पटेल यांनी मुंबई येथे आज (बुधवार) महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. विधिमंडळाच्या तसेच आमदारांच्या बैठकीत मावळते उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड व्हावी, असा प्रस्ताव मांडला. त्याला आर. आर. पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर बैठकीला उपस्थित सर्व आमदारांनी कोणत्याही चर्चेविना एकमताने पवार यांची निवड केली, असे पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पश्चिम महाराष्ट्राचे असलो, तरीदेखील संपूर्ण राज्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करू. राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी चव्हाण यांच्या देशातील राजकारणाच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग करून घेऊ, अशी प्रतिक्रिया पवार यांनी या वेळी व्यक्त केली. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे केंद्रीय निरीक्षक तारिक अन्वर, डी. पी. त्रिपाठी, मावळते उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच पक्षाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
राज्याचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून पवारही राज्यपालांना भेटणार असून, सरकार स्थापनेच्या निर्णयामध्ये सहभागी होतील.
पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड करताना भुजबळ यांना विश्वासात घ्यावे लागले का, असे विचारले असता भुजबळ यांनीच स्वत: पवार यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा संबंधच येत नाही, असे पटेल म्हणाले. पवार यांनी २२ वर्षांहून अधिक पक्षाची सेवा केली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे योगदान दिले आहे, असे मत भुजबळ यांनीच प्रस्तावात व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. छगन भुजबळ यांच्यावर कोणती नवी जबाबदारी सोपविणार, या प्रश्नावर पटेल यांनी भुजबळ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती, आहे आणि राहील, असे स्पष्ट केले.
पवार यांच्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ म्हणाले, पवार यांचे काम चांगले आहे. विधिमंडळाचे नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यात आहे. राज्यात काम करताना ते योग्य प्रादेशिक समतोल साधतील.

No comments: