Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 November, 2010

कॉंग्रेस सरकारविरोधात उद्या संघातर्फे निदर्शने

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - केंद्रातील "युपीए' सरकारने देशातील हिंदूच्या विरोधात कारवाया करण्यास आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या प्रखर राष्ट्रप्रेमी संघटनेला दहशतवादी संघटना ठरवण्याचा घाट घातल्याने केंद्रातील कॉंग्रेस सरकारविरोधात देशभर धरणे निदर्शने केली जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून गोव्यात १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३. ३० ते ६ दरम्यान दुर्गापूजा होत असलेल्या ठिकाणी पणजी बसस्थानक परिसरात धरणे धरले जाणार आहे.
संघाने पहिल्यांदाच थेट रस्त्यावर उतरून केंद्राच्या या कुटील कारस्थानाविरोधात दंड थोपटले आहेत. या धरणे कार्यक्रमात स्वयंसेवकांनी तसेच, देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोवा राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.पणजीत आज ते पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर दक्षिण गोवा संघचालक रामदास सराफ, सहकार्यवाह अवधूत कामत, दक्षिण गोवा कार्यवाह शिरीष आमशेकर व उत्तर गोवा कार्यवाह संजय वालावलकर उपस्थित होते.
युपीएच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी संघाला दहशतवादी संघटना ठरवावे ही शरमेची बाब आहे. संघ याचा सनदशीर मार्गाने विरोध करणार आहे.
हे संघावर पुन्हा बंदी आण्याचेही कारस्थान असू शकते, असे त्यांनी सांगितले.
जम्मू आणि काश्मीर राज्य भारतापासून वेगळे करण्याचा डाव केंद्रातील कॉंग्रेस सरकारने आखला असल्यास संघाकडून त्यास तीव्र विरोध होईल म्हणूनच संघाला दहशतवादी संघटना ठरवण्याचा डाव "युपीए' सरकारने आखला असल्याचा दावा श्री. वेलिंगकर यांनी केला.
काश्मीर खोऱ्यात प्रखर राष्ट्रप्रेम जागवणारे संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी इंद्रेशजी कुमार यांचा अजमेर बॉंबस्फोटांशी संबंध असल्याचे भासवून त्यांना त्यात गोवण्याचा प्रकार राजस्थान "एटीएस'द्वारे केंद्र सरकारने सुरू केला आहे. "एटीएस'ने आपल्या आरोपपत्रात म्हटल्या प्रमाणे अजमेर स्फोटात पकडलेले संशयित इंद्रेशजी कुमार यांच्या एका जाहीर सभेला उपस्थित होते. त्यामुळे उद्या सोनिया गांधी याच्या जाहीर सभेत सहभागी झालेल्या कोणा एका व्यक्तीने दुसऱ्या दिवशी दरोडा घातल्यास सोनिया गांधी यांच्यावर आरोपपत्र सादर करणारा का, असा खोचक सवाल श्री. वेलिंगकर यांनी केला.
गेल्या ८५ वर्षापासून संघ राष्ट्रवादी संघटना म्हणून वावरत आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या संचलनात संघ सहभागी झाला होता. त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील कार्यक्रमांच्या सुरक्षेची जबाबदारी संघावर सोपवली होती. जेव्हा सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचे निधन झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील थोर पुरुष गेल्याचे संबोधून लोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र त्याच कॉंग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे संघाला दहशतवादी संघटना ठरवण्याची कुटील कारस्थाने रचत असल्याचा आरोप श्री. वेलिंगकर यांनी केला.
"युपीए' सरकारने सत्तेवर येताच हिंदूंविरोधात कारवाया करण्यास सुरुवात केली होती. दिवाळीच्या एन तोंडावर कांची पिठाचे शंकराचार्य पूज्य जितेंद्र सरस्वती यांना एका खोट्या खुनाच्या आरोपाखाली रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर योगगुरू स्वामी रामदेव, श्री श्री श्री रविशंकर, आसाराम बापू यांच्या विरोधातही अपप्रचार करण्यास सुरुवात केली. हिंदू मंदिरांच्या समितीवर जबरदस्तीने मुस्लिमांना नेमण्याचे प्रकार सुरू केले. त्यानंतर, मंदिरातील प्रसाद बनवण्याचे काम ख्रिश्चनांना दिले जाऊ लागले. तसेच, तिरूपती मंदिराच्या आवारात अन्य धर्मीयांना त्यांच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
२००७ मध्ये देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यात झालेल्या एका गुप्त करारानुसार हे काम केंद्रातील "युपीए' सरकार करत असल्याचाही संशय येतो. कारण
या करारानंतर, पेपर व्हिसा देणे सुरू झाले. काश्मीरमधील सैन्य मागे हटवण्याचे प्रकार केंद्र सरकारने केले. सैन्यदलाचे अधिकार कमी करण्यात आले. भारतातील सैनिकांच्या हातून मरण पावलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयाचे पुनर्वसन करण्याचेही केंद्र सरकारने सुरू केले आहे, असा दावा श्री. वेलिंगकर यांनी केला.
आता त्या कराराचाच शेवटचा भाग म्हणून काश्मीर भारतापासून तोडून ती आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून घोषित करण्याचा डाव आखण्यात आला आहे. त्याच्या पूर्ततेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भारत भेट असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे श्री. वेलिंगकर म्हणाले. कारण, व्यापारविषयक चर्चा करण्यासाठी कोणत्या देशाचा प्रमुख येत नाही तर त्या देशाच्या संबंधित विभागाचा मंत्री येतो, असे श्री. वेलिंगकर यांनी निदर्शनास आणून दिले.

No comments: