Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 23 November, 2010

आंतरराष्ट्रीय सोहळ्यासाठी दर्जेदार सुविधा हव्यात : यश चोप्रा

४१व्या 'इफ्फी'चे पणजीत उद्घाटन
पणजी, दि. २२(प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय सोहळा आयोजित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची गरज लागते, असा जबरदस्त टोला हाणून गोव्यात भव्य कन्व्हेंशन सेंटरची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांनी केले. फिल्म उद्योगावर केंद्र सरकारने अमर्याद करांचा बोजा लादल्याने हा उद्योग संकटात सापडला आहे व याप्रकरणी वेळीच खबरदारी घेतली नाही तर वेळ निघून जाईल, असे स्पष्ट मत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना श्री. चोप्रा यांनी मांडले.
४१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज संध्याकाळी कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात उद्घाटन झाले. याप्रसंगी उद्घाटक केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, सन्माननीय अतिथी अभिनेता अजय देवगण, मुख्यमंत्री दिगंबर कामत, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री चौधरी मोहन जतुआ व एस. जगतरक्षकन, सभापती प्रतापसिंग राणे, केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक एस. एम. खान आदी हजर होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळ सदस्यांचा श्री. चोप्रा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यात परीक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा नामवंत पोलीश दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते जेर्झी अँटझॅंक, ऑस्कर नामांकनप्राप्त कॅनडीयन दिग्दर्शक स्टुला गन्नारसन, ऑस्ट्रेलियन अभिनेता व निर्माता मिक मॅल्लॉय, फ्रेंच लेखक ऑलिव्हर पेरे व दक्षिण चित्रपटातील नामवंत सिनेतारका व राष्ट्रीय पुरस्कार विजेती रेवती यांचा समावेश होता.
चित्रपट उद्योगाबाबत सगळेच बोलतात पण केंद्र सरकारने लादलेल्या विविध जाचक करांमुळे हा उद्योग संकटात सापडला आहे. या संकटाची वेळीच दखल घेतली नाही तर हा उद्योग कोलमडण्याचाही धोका श्री. चोप्रा यांनी वर्तविला. ममता बॅनर्जी यांनी हा विषय केंद्रापर्यंत पोहवावा, असे आवाहन त्यांनी केले.

चित्रपट उद्योगाच्या समस्या सरकारसमोर मांडणार : ममता
या सोहळ्याला उद्घाटक म्हणून लाभलेल्या केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या सहज व मोकळ्या भाषणांत चित्रपट व मनोरंजन उद्योगाची स्तुती केली. यश चोप्रा यांनी व्यक्त केलेल्या विषयांचा दिल्लीत पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. चित्रपट माध्यमांमुळे समाजातील अनेक अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकला जातो व त्यामुळे त्यांच्यावर अंकुश राहतो. तळागाळातील विषय हाताळून चित्रपटांनी लोकांना न्याय देण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या क्षेत्रातील सगळ्यांना एकत्र आणणारा हा मेळा गोव्यासारख्या सुंदर प्रदेशात आयोजित व्हावा, ही सुखद गोष्ट असल्याचेही त्या म्हणाल्या.
गोव्यात सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी दोन जागांची पाहणी केली आहे व लवकरच या कामाला प्रारंभ होईल, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत आपल्या भाषणांत म्हणाले. सुरुवातीला एस. एम. खान यांनी स्वागत केले. अजय देवगण यांनी हा महोत्सव म्हणजे चित्रपट उद्योगातील सर्वांना एकत्रित आणणारा महाकुंभ असल्याचे प्रतिपादन केले. आफताब शिवदासनी आणी ग्रेसी सिंग यांनी या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यात दिव्या दत्ता, राजकुमार हिरानी, प्रसन्नचित्त, सनत गुणातलिके, जॅन जेकब, मनोज वाजपेयी, जयराम आदींचा समावेश होता.
-------------------------------------------------------
'गोव्यात हा महोत्सव आणण्यापूर्वी इथल्या साधन सुविधांची पाहणी करण्यासाठी मी इथे आलो होतो व त्याचवेळी कला अकादमीची निवड केली होती. त्याकाळी सुसज्ज सिनेमागृह नव्हते व म्हणूनच अवघ्या सहा महिन्यांत आयनॉक्स उभे करण्यात आले. मात्र अजूनही या महोत्सवासाठी कला अकादमीचाच वापर होत असल्याबद्दल मला आश्चर्य वाटते आहे. इथे १२ सिनेमागृहांचे कन्व्हेंशन सेंटर उभे राहायलाच हवे'' - यश चोप्रा

No comments: