Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 27 November, 2010

'स्वातंत्र्यवीरां'बद्दलचा कॉंग्रेसचा आकस पुन्हा समोर

पर्यटन पुस्तिकेत सावरकरांचे नावच वगळले
नवी दिल्ली, दि. २६ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भोगलेल्या तुरुंगवासाने संपूर्ण जगभरात ख्यातिप्राप्त झालेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवरच्या पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या पुस्तिकेत सावरकरांच्या नावाचा उल्लेखच नसल्याची लेखी कबुली दस्तूरखुद्द सरकारनेच आज संसदेत दिल्यानंतर भाजपने या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
२-जी स्पेक्ट्रमसह भ्रष्टाचाराच्या सर्वच प्रकरणांची चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहत विरोधकांनी आज सलग ११ व्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळामुळे कुठलेही कामकाज होऊ शकले नाही. राज्यसभेत प्रचंड घोषणाबाजी सुरू असतानाच उपाध्यक्ष रहमान खान यांनी काही आवश्यक कामकाज निपटण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही समित्यांचे अहवाल व निवेदने संसदेच्या पटलावर ठेवण्यात आली. त्यांपैकी एका लेखी उत्तरात माहितीपुस्तकात सावरकरांचा उल्लेखच नसल्याचा खुलासा झाला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कॉंग्रेसजनांच्या मनात असलेला आकसच यातून दिसून आला आहे, अशी तीव्र भावना भाजप सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजप सदस्य अनिल दवे यांनी अंदमान आणि निकोबारमधील पर्यटनाबाबत एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री सुलतान अहमद यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सरकारने ही कबुली दिली आहे. गेल्या मे महिन्यात मी अंदमानला गेलो होतो. त्याठिकाणी प्राप्त झालेल्या पर्यटनविषयक माहितीपुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव आणि छायाचित्रच नसल्याचे माझ्या लक्षात आले. हा संतापजनक प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मी संसदेत हा प्रश्न उपस्थित केला होता, असे अनिल दवे यांनी याबाबत बोलताना सांगितले.

No comments: