Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 23 November, 2010

माझा कुणीही राजीनामा मागितलेला नाही : येडियुरप्पा

नवी दिल्ली, दि. २२ : भाजप पक्षश्रेष्ठींना येथे भेटावयास आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले की, पक्षातील कोणीही आपल्याकडे राजीनामा मागितलेला नाही.
आपण मुख्यमंत्रिपद सोडावे, असे पक्षश्रेष्ठींना वाटत आहे तर अशा स्थितीत आपण पदाचा राजीनामा देणार का, असे पत्रकारांनी विचारले असता येडियुरप्पा यांनी उपरोक्त उत्तर दिले. कर्नाटकमधील माझ्या पक्षाच्या खासदारांशी मी प्रथम भेटेन व त्यानंतर भाजप नेतृत्वाबरोबर चर्चा करीन, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील जमीन वाटपात ज्या अनियमितता झाल्या आहेत त्यात आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाही याचा लाभ झाला आहे, असे जे आरोप होत आहेत त्यावर बोलताना ते म्हणाले, याप्रकरणी न्यायालयीन चौकशी याआधीच सुरू झालेली आहे.
याआधी येडियुरप्पा यांनी आपल्या समर्थकांची एक टीम तयार करून, जर गच्छंती झाली तर त्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात यावी याची योजना आखली. दरम्यान, आज कर्नाटकचे शिक्षण मंत्री आचार्य यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली व पक्षनेतृत्वाने येडियुरप्पा यांच्या भविष्यासंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही असे स्पष्ट केले.
चौकशी आयोग नेमला
दरम्यान, बंगलोर येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील जमीन वाटप प्रकरणात झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने आज उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. पद्मराज यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय चौकशी आयोग स्थापन केला आहे.

No comments: