Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 November, 2010

शिरगावच्या खाण संकटावर माहितीपट, चित्रपटाचा प्रस्ताव


पर्यावरणप्रेमींकडून "इफ्फी'चा असाही उपयोग


पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय चित्रपटांच्या माध्यमाने संपूर्ण जगात पसरू शकतो, तर गोव्यातील बेसुमार खाण उद्योगामुळे देशोधडीला लागलेल्या लोकांचा विषय का हाताळला जाऊ शकत नाही. शिरगाव गावावर ओढवलेल्या खाण संकटाचा विषय "इफ्फी' च्या निमित्ताने पुढे नेण्याची तयारी राज्यातील काही पर्यावरणप्रेमींनी चालवली आहे.
गोव्यातील एक प्रमुख धार्मिक महत्त्वाचे स्थळ म्हणून परिचित असलेल्या शिरगाव गावावर बेसुमार खाण उद्योगामुळे ओढवलेल्या संकटाचा विषय आता माहितीपट किंवा चित्रपटाच्या माध्यमाने सर्वत्र पसरवण्याचा प्रस्ताव काही पर्यावरणप्रेमींनी चालवला आहे. आत्तापर्यंत शिरगावच्या या विषयाची स्थानिक तथा राष्ट्रीय वृत्तपत्रांनी दखल घेतली परंतु राज्य तथा केंद्र सरकारकडून काहीच झाले नाही. प्रशासनाला झोपेच्या सोंगातून जागे करावयाचे असेल तर शिरगावच्या विषयावर एखादा माहितीपट किंवा येथील ग्रामस्थांच्या हालअपेष्टांची कहाणी विषद करणारा चित्रपट तयार होणे गरजेचे आहे."इफ्फी' च्या निमित्ताने गोव्यात अनेक नामवंत निर्माते व दिग्दर्शक येतात. पर्यावरण विषयांवरील खास निर्माते व दिग्दर्शकांना भेटून त्यांच्यासमोर शिरगावातील हा विषय ठेवण्याची तयारी काही स्थानिक पर्यावरणप्रेमी तथा खाणविरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चालवली आहे, अशी माहिती दिलीप गावकर यांनी दिली. येथील खाणीमुळे निर्माण झालेली परिस्थिती दर्शित करणारी छायाचित्रे तथा शिरगावचा इतिहास त्यांच्यासमोर लिखित स्वरूपात ठेवण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिरगाव हे प्रमुख धार्मिक स्थळ असल्याने व अशा परिस्थितीत या गावावर खाणीचे हे संकट ओढवल्याने हा विषय बराच लोकप्रिय होऊ शकेल व त्यातून कदाचित शिरगाववरील हे संकटही दूर होण्यात मदत होईल, असा असा विश्वास श्री.गावकर यांनी व्यक्त केला.
हा कसला उलटा न्याय
शिरगावातील या खाणींचा विषय प्रसारमाध्यमांत येऊ नये यासाठी गावातील एक गट सक्रिय बनला आहे. थेट पत्रकारांना धमकावण्यापर्यंत या लोकांनी मजल मारली आहे, असा आरोप दिलीप भास्कर गावकर यांनी केला. खरे तर एवढीच गावाची काळजी वाहणाऱ्या या लोकांनी खाण उद्योगाच्या विरोधात लिहिण्याचे धाडस करणाऱ्या पत्रकारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. शिरगावातील खाणीच्या बातम्यांमुळे गावाची बदनामी होते व गावातील लोकांत फूट पडते, असा जो कुणी जावईशोध लावला आहे त्याला शिरगावातील लोकांनीच आता जाब विचारावा, असे श्री.गावकर म्हणाले. अलीकडेच खाण खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार "मेसर्स राजाराम बांदेकर खाण कंपनीचे "लीझ' नूतनीकरण करण्यात आले आहे. या "लीझ' करारात ज्या सर्वे क्रमांकांचा उल्लेख आहे त्यात शिरगावातील काही महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. या अधिसूचनेबाबतची माहिती काही वृत्तपत्रांत छापून आल्याने त्या वृत्तपत्रांना धमकावण्याचा काही लोकांनी जो प्रकार केला तो अत्यंत निषेधार्ह आहे, अशीही टीकाही यावेळी श्री.गावकर यांनी केली.

No comments: