Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 November, 2010

'मेरी जिंदगी इतनी बडी है की...'

सिंधुताई सपकाळ यांनी उघडला मनाचा पट
पणजी, दि. २३ (सागर अग्नी): "मेरी जिंदगी इतनी बडी है की, कोई उसे पकड नही सकता। लेकीन इन्होंने यह बहुत बढीया काम किया हैं'', असे आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेले उद्गार आज "जगद्माउली' सिंधुताई सपकाळ यांनी काढले. "मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात आपले जीवन यथायोग्य पद्धतीने साकारले आहे का, असा प्रश्न विचारला गेल्यावर "माईं'च्या तोंडून हे सार्थ उद्गार निघाले.
माईंच्या जीवनावर आधारीत "मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाने ४१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या "भारतीय पॅनोरमा' विभागाचा आज मंगळवारी शुभारंभ झाला. या शुभारंभी प्रयोगास "माई' जातीने हजर होत्या. तेथे त्यांनी आपल्या मनातील भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या.
स्त्री ही एक महान शक्ती आहे. तिने आपल्या मातीशी इमान राखले पाहिजे. ज्या भूमीत आपण जन्म घेतला त्या मातीशी तिने स्वतःचे वेगळे नाते निर्माण केले पाहिजे. तरच त्या स्त्री शक्तीला अर्थ आहे; अन्यथा ती अधोगती ठरेल, असे स्त्रीशक्तीचे महत्त्व त्यांनी विशद केले. माझ्यावर चित्रपट काढून निर्माते व कलाकारांनी माझ्यावरील जबाबदारीची मला जाणीव करून दिली आहे. माझे जीवनच त्यांनी चित्रपटातून साकारण्याची जी उठाठेव केली त्यातून माझ्यावरील जबाबदारीचे ओझे मला आता अजूनच भारी वाटू लागल्याचे माई म्हणाल्या. हा चित्रपट माझ्या जीवनाचा अर्क आहे. माझे तुटलेले जीवन त्यांनी चित्रपटाव्दारे सांधले आहे. माझा भूतकाळ पडद्यावर येईल असे मला कधीच वाटले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
मला "आई' म्हटलेले आवडत नाही. मी सांभाळ करत असलेल्या अनाथ मुलांनी मला "आई' या नावाने एवढी "ओव्हरलोड' केली आहे की, ते नाव आता नकोसेच झाले आहे. त्यापेक्षा मला "माई' म्हटलेले आवडते. माझ्यावर काढलेल्या चित्रपटाने मला खूप आनंद झाला आहे. हा आनंद अवर्णनीय आहे. खरे तर अनंत महादेवन हा चित्रपट अर्ध्यावर टाकून देतील असे मला वाटले होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. माझी बिचारीची व्यथा ऐकण्याची कोणाची तयारी असेल असे मनात देखील आले नव्हते. तथापि महादेवन यांची सचोटी व जिद्द यांना मी सलाम ठोकते. त्यांनी मनात आणलेला चित्रपट केवळ पूर्ण केला नाही तर त्या चित्रपटासह मलादेखील त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे माई गहिवरल्या स्वरात म्हणाल्या.
""बारा ते तेरा वर्षांची असताना माझे लग्न झाले. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळीकडून माझा छळ सुरू झाला. नवऱ्याने देखील मला लाथाडले. माहेरी गेल्यावर माझ्या आईनेही माझ्याकडे तोंड फिरविले. त्यावेळी माझी अवस्था केविलवाणी झाली होती. पदरी एका वर्षाची मुलगी होती. मात्र मी हिंमत हरले नाही. आज त्या सर्वांना मी माफ केलेय. कारण त्यांनी जर माझ्यावर अत्याचार केले नसते, मला लाथाडले नसते तर आज मी "सिंधुताई सपकाळ' म्हणून आपल्या समोर आलीच नसते'', असे त्या सांगत असताना सर्वांचे डोळे पाणावले. माईंचाही गळा यावेळी भरून आला होता.
""त्यावेळची समाजव्यवस्था काही विचित्रच होती. त्या समाजव्यवस्थेचा मी बळी ठरले. माझ्या वाट्याला जे दुःख आले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठीच मी माझे नवीन जीवन सुरू केलेे'', असे माई अभिमानाने सांगतात. त्यातून त्यांची जगण्यासाठीची जिद्द व चिकाटी दिसून आल्याखेरीज राहत नाही. आपल्या भूतकाळाविषयी बोलताना माई सांगतात, ""अनेक हालअपेष्टा सोसून मी माझ्या जीवनाची वाट चालत होते. या वाटचालीत अनेक अडथळेही होते. परंतु, नियतीने त्यांना वेळोवेळी दूर करून माझा रस्ता मोकळा केला.''
स्त्रीने खूप शिकले पाहिजे, खूप मोठे झाले पाहिजे असे सांगताना आधुनिकीकरणाच्या कचाट्यात तिने "ओव्हरलोड' होऊ नये, असा सबुरीचा सल्लाही माईंनी भारतीय स्त्रियांना उद्देशून दिला. माती, नीती व संस्कृती जेथे हातात हात घालून चालतात तो माझा देश आहे, अशा भाषेत माईंनी भारत देशाचे वर्णन केले. त्यांच्या या वर्णनातून त्यांनी भारतमातेशी जोडलेले अतूट नाते स्पष्ट जाणवत होते व त्यांच्या या वर्णनातून त्याचे देशप्रेमही दिसून येत होते. आधी मी अनाथांची "माय' होते व आजही आहे. तरीही माझ्यावरील चित्रपटाने मला "जगद्माऊली' केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
-------------------------------------------------------
गोव्यात मी यापूर्वी अनेकदा आले आहे. त्यामुळे मला गोवा हा तसा नवा नाही. गोवा जरी मला प्रिय नसला तरी गोवेकर मला अतिशय प्रिय आहेत; कारण ती जिवंत मनाची माणसे आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने गोव्यात आल्यामुळे माझा आनंद व्दिगुणित झाला आहे. या चित्रपटानेच मला यावेळी फरफटत गोव्यात आणले. -सिंधुताई सपकाळ

No comments: