Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 21 November, 2010

मडगाव रवींद्र भवनात २७ चित्रपट प्रदर्शित होणार


रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी येणार
कार्यालयीन वेळेत बदल नाही


पणजी, दि.२० (सांस्कृतिक प्रतिनिधी) - गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने मडगावातील रवींद्र भवनात दि.२३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यत २७ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आज झालेल्या पत्रपरिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली. दरम्यान, इफ्फीत २ डिसेंबर रोजी "ग्रीन रागा' बॅंडचे सूर निनादणार आहेत.
मडगावातील रवींद्र भवनात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी लागणाऱ्या सर्व साधनसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचा पुरेपूर उपयोग व्हावा तसेच मडगाववासीयांना इफ्फीचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून हे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. नोंदणीकृत प्रतिनिधींना मडगावात चित्रपट पाहण्याची संधी तर मिळेलच; शिवाय चित्रपटाच्या दिवशी नोंदणी करूनही रसिकांना चित्रपट पाहायला मिळतील. तसेच या महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असून काहींना मडगावात नेण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केल्या जात असलेल्या "इफ्फी' मुळे गोव्यात चित्रपट संस्कृती रुजत चालली आहे. त्याचा पुरावा म्हणजे यावर्षीच्या लघुपट चित्रपट स्पर्धेसाठी गोव्यातील तीन चित्रपटांची झालेली निवड. कालांतराने ही
संख्या वाढला जाईल यात शंका नाही. गोमंतकीय निर्मात्यांना चांगले चित्रपट तयार करावेत सरकारचा त्यांना पाठिंबाच असेल असेही ते म्हणाले.
अवेळी पावसावर मात करूनही इफ्फीची तयारी योग्य वेळेत आणि योग्यरीतीने झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी काही कारणास्तव "इफ्फी'तसहभागी होणार नसून त्यांच्याऐवजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित येण्याचे अजून नक्की झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय महोत्सवासंदर्भात जो दरवर्षी सामंजस्य करार केला जातो तो कायमस्वरूपी का केला जात नाही यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दरवर्षी नवनवीन गोष्टी घडत असतात. त्यामुळे बदलत्या काळातील आणखी काही गोष्टींचा फायदा गोवा राज्याला करून घ्यायचा असल्यास कायमस्वरूपी सामंजस्य करारामुळे तो घेता येणार नाही. त्यासाठी काळाप्रमाणे बदलत्या गोष्टींचा योग्य फायदा घेण्याच्या उद्देशाने एका वर्षाचा करार उपयुक्त ठरतो.
"इफ्फी'च्या निमित्ताने कोणत्याही कार्यालयाची वेळेत बदल करण्यात येणार नाही कारण कार्यालयांच्या वेळेत बदल केल्यास सामान्य लोकांना कार्यालयीन कामासाठी मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वाहतुकीचा होणारा खोळंब थांबवण्याकरिता जादा वाहतूक पोलिसांची नेमणूक करून तो प्रश्न सोडवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

"तो' केंद्राचा निर्णय
"सुपरस्टार' अमिताभ बच्चनला इफ्फीसाठी का आमंत्रित केले जात नाही, असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी तो केंद्राचा निर्णय असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

No comments: