Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 24 November, 2010

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी प्रा. सुरेंद्र सिरसाट यांची निवड

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांच्या नावाची घोषणा पक्षश्रेष्ठींतर्फे आज करण्यात आली. महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्यात आले आहे. पक्षाचे प्रभारी डॉ. प्रफुल्ल हेदे व निरीक्षक प्रकाश बिनसाळे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षश्रेष्ठींनी म्हटले आहे.
माजी पर्यटनमंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको व महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्यात पालिका निवडणूक प्रचारावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान जुझे फिलिप डिसोझांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना सादर करण्यात झाले होते. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावर निवड होण्यासाठी पक्षाच्या अनेक नेत्यांनी जोरदार प्रयत्न चालवले होते. या स्पर्धेत माजी मंत्री संगीता परब, माजी आमदार तथा पक्षाचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू, माजी मंत्री पांडुरंग राऊत, डॉ. कार्मो पेगादो आदींची नावे प्रामुख्याने घेतली जात होती. या सर्व नेत्यांत राजकारणाचा गाढा अनुभव असलेले व त्याहीपेक्षा एक सुशिक्षित व स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती म्हणून परिचित असलेले प्रा. सिरसाट यांच्याकडेच ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला.
आपली राजकीय कारकीर्द महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात घडविल्यानंतर बऱ्याच काळाने प्रा. सिरसाट यांनी विजय मल्ल्या यांच्या जनता पक्षात प्रवेश केला होता. तद्नंतर गोव्यातील जनता पक्षाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आले. सध्या प्रा. सिरसाट हे गोवा पुनर्वसन महामंडळाच्या अध्यक्षपदी आहेत.
दरम्यान, प्रा. सिरसाट यांच्या निवडीमुळे म. गो. पक्षाचा मोठा चाहतावर्ग राष्ट्रवादीकडे आकृष्ट करण्याची योजना पक्षाच्या श्रेष्ठींनी आखल्याचीही खबर आहे. म. गो.ची संघटनात्मक घडी पूर्णपणे विसकटलेली आहे. राज्यात १७ वर्षे सत्ता उपभोगलेला हा पक्ष केवळ ढवळीकरबंधूंपुरताच मर्यादित राहिलेला आहे. विविध मतदारसंघांत गट समिती स्थापन करण्यासाठीही पक्षाला पदाधिकारी सापडत नाहीत, अशी बिकट परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. म. गो. हा विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारचा घटक आहे. सुदिन ढवळीकर हे वाहतूकमंत्री आहेत तर दीपक ढवळीकर यांच्याकडे कदंब महामंडळाचे अध्यक्षपद असल्याने सरकारातील ही पदे शाबूत ठेवण्यासाठीच त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष चालवल्याची टीका म. गो.चे कार्यकर्तेच करीत आहेत. प्रा. सिरसाट यांच्या निवडीमुळे म. गो. पक्षाकडे बाकी राहिलेल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी येत्या काळात जोरदार प्रयत्न सुरू होतील, असे स्पष्ट संकेतही मिळाले आहेत.

No comments: