Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 22 November, 2010

"इफ्फी'चा झगमगाट आजपासून

रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी उद्घाटक

-यश चोप्रा, अजय देवगणची उपस्थिती
-तब्बल नव्वद लाखांची पारितोषिके
-६१ देशांतील ३०० चित्रपटांचे प्रदर्शन


पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - जगातील सर्वांत जास्त किमतीची म्हणजे तब्बल नव्वद लाख रुपयांची पारितोषिके असलेल्या ४१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) चंदेरी पडदा उद्या (सोमवारी) सायंकाळी दिमाखात उघडणार आहे. कला अकादमीचे मा. दीननाथ मंगेशकर सभागृह या भव्य वास्तूत केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या शुभारंभावेळी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता यश चोप्रा, अभिनेते अजय देवगण, अभिनेत्री रिमा सेन व गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित असतील. उद्घाटनानंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन (बीबीसी) ने निर्मित केलेला आणि एंदे दिईमोने यांनी दिग्दर्शक केलेला ""वेस्ट इज वेस्ट'' हा चित्रपट दाखवला जाणार आहे, तसेच दिल्ली येथील सेहर फाउंडेशनच्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आस्वाद यावेळी लुटायला मिळणार असल्याचे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत महोत्सव संचालक एस एम. खान, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव व डी पी. रेड्डी उपस्थित होते.
यावर्षी "इफ्फी'च्या पारितोषिकांत भर पडली असून पहिल्यांदाच उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री हा पुरस्कार या वर्षापासून दिला जाणार जाणार आहे. पारितोषिकांचा नव्वद लाखांचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. यातील उत्कृष्ट चित्रपटांसाठी सुवर्ण मयूर आणि ४० लाख रुपये, उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रौप्य मयूर आणि १५ लाख रुपये, उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी रौप्य मयूर आणि १० लाख रुपये आणि खास परीक्षकांचा पुरस्कारासाठी रौप्य मयूर आणि १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.
तसेच, यावर्षी तीन लाख रुपयांचा 'यंग ज्युरी अवॉडर्र्' हा उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिला जाणार आहे. "लोकमत' समूहाने हा पुरस्कार जाहीर केला असल्याचे यावेळी श्री. कामत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, महोत्सवातील चित्रपट पाहण्याऱ्यांसाठी आणि प्रतिनिधीसाठी संकेतस्थळावर जाऊन तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात हॉलिवूड आणि बॉलिवूडचे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थिती लावणार आहेत, तसेच दरदिवशी रात्री ८ वाजता आतषबाजी केली जाणार असून ते एक आकर्षण ठरेल.
आजपासूनच पणजी शहरात इफ्फिची रेलचेल सुरू झाली असून प्रतिनिधींचेही आगमन झाले आहे. शहरात सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी पणजी शहराचा मुख्य रस्ता "१८ जून' वर अन्न आणि खरेदी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी इफ्फीत ६१ देशातील ३०० चित्रपट ११ ठिकाणी दाखवले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी १८ चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यातील केवळ ३ चित्रपट हे भारतीय आहेत. महोत्सव दरम्यान, अशोक कुमार, बी आर. पनथूल्लू, मोतीलाल, नादिया आणि राजा परांजपे यांचे चित्रपट दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. तर, खास चित्रपट म्हणून शेतकऱ्यांवर चित्रित केलेला "पिपली लाइव्ह' हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

No comments: