Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 November, 2010

भाजप श्रेष्ठींकडून येडीयुराप्पांना अभय

नवी दिल्ली, दि. २४ - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा आपल्या पदावर कायम राहतील, असे भाजप श्रेष्ठींनी आज सांगितले. भ्रष्टाचार व भाईभतिजावादाचा आरोप येडीयुरप्पा यांच्यावर केला जात आहे.
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी तसेच कर्नाटकमधील पक्ष नेत्यांशी विचारविनिमय केल्यानंतर येडीयुराप्पा यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच राज्यातील अनिश्चिततेचे सावटही आता दूर झाले आहे.
पक्षाध्यक्षांचे निवेदन वाचून दाखवताना पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, येडीयुराप्पा यांच्याविरुद्ध जमीन वाटपाचे जे आरोप केले गेले आहेत त्याची चौकशी कर्नाटक सरकारकडून नियुक्ती करण्यात आलेला चौकशी आयोग करणार आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच या व अशा अनेक आरोपांची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. आता पक्षाध्यक्ष गडकरी यांच्या आजच्या निवेदनाने येडीयुराप्पा यांना अभयदान मिळाले आहे. येडीयुरप्पा यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे व भाईभतिजावादाचे आरोप केले जात होते त्यामुळे राज्यातील राजकारण काही काळ अनिश्चित झाले, याकडे गडकरी यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे.
दरम्यान, भाजप श्रेष्ठींनी अभयदान दिल्याची घोषणा केल्यानंतर येडीयुराप्पा यांनी म्हटले की, पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज व अरुण जेटलींसारख्या नेत्यांचे मला आशीर्वाद आहेत. भाजप श्रेष्ठींनी मला केव्हाही राजीनामा देण्यास सांगितले नव्हते.
२ जी स्पेक्ट्रम घोटाळा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनातील घोटाळ्याशी याची तुलना करता येत नाही, असे सांगून जावडेकर म्हणाले, ही काही आरोप करण्यासारखी बाब नाही. स्पेक्ट्रम व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनातील घोटाळ्याची चौकशी करण्यास कॉंगे्रसने नकार दिला आहे उलट कर्नाटक सरकारने मुख्यमंत्र्यांविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोगच नेमला असून चौकशी सुरू झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याउलट सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर कॉंगे्रस सरकारने उपरोक्त घोटाळ्यांच्या चौकशीसंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत, असेही जावडेकरांनी सांगितले.

No comments: