Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 26 November, 2010

सुवर्णपदकांची 'हॅट्ट्रिक'!

एशियाडमध्ये भारताचे सोनेरी दशक
ग्वॉंग्झू, दि. २५ : बॉक्सिंगमध्ये ६० किलो वजनी गटात विकास कृष्णनने प्रतिस्पर्ध्यावर सोनेरी ठोसा लगावत भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या दहावर नेली. त्याआधी ४०० मीटर अडथळा स्पर्धेत पुरुष गटात जोसेफ अब्राहम याने तर महिला गटात अश्विनी अक्कुंजीने विजयी धाव घेऊन दोन सुवर्ण पदके पटकावून गुरुवारी भारताची सुवर्णपदकांची "हॅट्ट्रिक' पूर्ण केली.
बॉक्सिंगमध्ये भारताचे खाते उघडताना विकास कृष्णनने चीनच्या क्विंग हूचा ५-४ असा केला पराभव केला. १८ वर्षीय विकासने उपांत्य फेरीत उझबेकस्तानच्या हर्षिद तोजिबेव्हला ७-० अशी धूळ चारली होती.
त्याआधी ४०० मीटर अडथळा शर्यतीत महिला आणि पुरुषांच्या गटातही भारताने सुवर्ण पदक पटकावले. महिलांमध्ये आश्विनी अक्कुंजी हिने तर पुरुषांच्या गटात जोसेफ अब्राहम याने विजयी धाव घेत भारताला अनुक्रमे आठवे आणि नववे सुवर्णपदक मिळवून दिले.
विकासच्या या पदकांमुळे भारत सातव्या क्रमांकावर आला असून पदकांची संख्या ५२ झाली आहे. यात १० सुवर्ण, १३ रौप्य आणि २९ ब्रॉंझ पदकांचा समावेश आहे.

२६/११ ला उद्या दोन वर्षे पूर्ण होणार; दक्षतेचा इशारा
मुंबई/ नवी दिल्ली, दि. २५ : मुंबईवरील सर्वांत भयानक दहशतवादी हल्ल्याला उद्या (शुक्रवार, दि. २६) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील, विशेषतः: महाराष्ट्र आणि दिल्लीतील सर्व सार्वजनिक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या हल्ल्यात ठार झालेल्या १६६ नागरिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुंबईत उभारण्यात आलेल्या स्मारकाला केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम उद्या समस्त मुंबईकरांच्या साक्षीने श्रद्धांजली वाहणार आहेत.
२६/११ च्या पार्श्वभूमीवर देशातील सध्याच्या सुरक्षा बंदोबस्ताविषयी विचारले असता, भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल पी. व्ही. नाईक यांनी सांगितले की, मुंबई दहशतवादी हल्ल्यासारखा कोणताही हल्ला मोडून काढण्यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. ज्यावेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हाही सुरक्षा यंत्रणा होतीच. ती अद्यापही कायम आहे. उलटपक्षी, आता सुरक्षायंत्रणा अधिक बळकट करण्यात आली आहे.

No comments: